वरळी गावातील लाल तारा निखळला...


एकाच विभागातून सतत 45 वर्षे नगरसेवक म्हणून यशस्वी व निष्कलंक कारकीर्द गाजवणारे व वरळी गावातील जनमानसाच्या मनामनावर राज्य करणारे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉ. मणीशंकर कवठे यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. तरूण वयात हातात घेतलेला लाल झेंडा व कम्युनिस्ट पक्षाशी जुळलेली वैचारिक नाळ अगदी शेवटच्या क्षणापर्यंत कायम होती. मृत्यूच्या अगदी आठ दिवसांपूर्वीही कार्यरत असलेल्या या सच्च्या लाल सैनिकास शेवटचा निरोप देताना वरळी गावातील लहानथोर मंडळी गहीवरून गेली होती.

अगदी बालवयातच स्वातंत्र्य चळवळीत सामील झालेले कॉ. मणीशंकर कवठे पुढे कम्युनिस्ट पक्षाकडे ओढले गेले. 1942 च्या आंदोलनात कॉ. मणीशंकर कवठे यांचा सक्रिय सहभाग होता. वरळी गावात असलेली पोलीस चौकी जाळण्याचे काम कॉ. कवठे यांच्यावर सोपविण्यात आले. यामध्ये एका युरोपीयन साहेबाचा मृत्यू झाला होता. यामध्ये वयाने लहान असल्यामुळे कॉ. कवठे यांना शिक्षा झाली नाही.

कॉ. मणीशंकर यांना लहानपणापासूनच व्यायाम व पोहण्याची आवड होती. एका राष्ट्रीय कँपच्या निवडीसाठी पूर्वतयारी म्हणून साने गुरुजींच्या नेतृत्वाखाली नेरळ येथे एक कँप घेण्यात आला होता. या कँपमध्ये पोहण्यात तरबेज असलेल्या मणीशंकर कवठे यांना पाहून साने गुरुजींनी त्यांना देवमासा हे नाव ठेवले होते.https://saptahikyugantar.blogspot.com/ 

कॉ. कवठे यांना गिरणीच्या संपात तसेच अनेक आंदोलनांत तुरूंगवास भोगावा लागला. मात्र समाजसेवेचे लागलेले त्यांचे वेड तिळमात्रही कमी नाही झाले. कॉ. कवठे यांनी 1957 मध्ये लाल निशाण पक्षातर्फे पहिली निवडणूक लढवली व ते जिंकून आले. यांनतर हा नगरसेवकपदाचा प्रवास सतत 45 वर्षे चालू राहिला. दरवेळी प्रचंड मताधीक्य व लोकांचा प्रचंड विश्वास घेत कॉ. कवठे आपले काम करत राहिले. नगरसेवकपदाच्या 45 वर्षांच्या कालखंडात यांच्यावर एकही आरोप नाही झाला. नगरसेवक म्हणून काम करत असताना स्थानिकांचे प्रश्न प्रामुख्याने सोडवत असताना कधीही पक्षीय हेवेदावे आणले नाहीत. वरळी गावातील लोकांचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील राहिले. त्यामुळे स्थानिकांच्या मनात कॉ. कवठे घर करून राहिले.


कॉ. मणीशंकर कवठे यांनी वरळी गावातील लोकांसाठी केलेले एक अविस्मरणीय कार्य म्हणजे जनता शिक्षण संस्था ज्या भागातून स्थानिक मुलांना शिक्षणासाठी अनेक मैल पायपीट करावी लागत होती त्याठिकाणी अथक परिश्रम करून कॉ. कवठे यांनी जनता शिक्षण संस्था उभारली. या शिक्षण संस्थेमधून आज हजारो विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडले व आजही ही संस्था दर्जेदार शिक्षण देण्यासाठी नावाजलेली आहे.

नगरसेवक म्हणून कॉ. कवठे यांनी अनेक कामे केली. स्थानिक भागात संडास नव्हते. टोपली संडास होते. समुद्र किनारी लोक शौचास जात. कॉ. कवठे यांनी याठिकाणी अद्यावत अशी 6 ते 7 ठिकाणी शौचालये बांधली. तसेच मोफत म्युनिसिपल दवाखाना, सार्वजनिक कपडे धुण्याची जागा, रस्त्यांवरील दीवे, चांगले रस्ते, शुद्ध पाणीपुरवठा अशी अनेक लोकोपयोगी कामे कवठे यांनी आपल्या कारकिर्दीत केली. सद्य:परिस्थितीचा विचार करता व टक्केवारीचे राजकारण जर कवठे यांनी केले असते तर करोडोंची माया ते जमवू शकले असते. मात्र एका सच्चा कम्युनिस्ट कार्यकर्त्यांकडून असे होणे शक्यच नाही.https://saptahikyugantar.blogspot.com/ 

1968 मध्ये कॉ. कवठे निवडून आल्यानंतर विजयी मिरवणूक काढण्यात आली. या निवडणुकीत शिवसेनेच्या पराभवामुळे बिथरलेल्या शिवसैनिकांनी या मिरवणूकीवर पूर्वनियोजीत हल्ला केला. यामध्ये वाटेत गटाराची झाकणे उघडी करणे, ॅसीडचे फुगे मिरवणुकीवर टाकणे असे लाजीरवाणे प्रयोग या मिरवणुकी दरम्यान करण्यात आले.

नगरसेवक म्हणून काम करत असताना कॉ. कवठे यांनी आपल्या कम्युनिस्ट विचारांशी व कम्युनिस्ट तत्त्वांशी कधीही फारकत घेतली नाही. जात, धर्म यापलीकडे जावून आपल्या कार्याचा ठसा उमटवला. एक आदर्श राजकारणी, नगरसेवक कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कॉ. मणीशंकर कवठे होय. त्यांच्या निधनाने भारतीय कम्युनिस्ट पक्षाची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे. त्यांच्या स्मृतीस भाकप, ‘युगांतरसाप्ताहिक यूथ फेडरेशनकडून विनम्र आदरांजली. त्यांचे कार्य पुढे नेण्यास आमचे सर्व कार्यकर्ते सदैव कार्यरत राहतील.
- कॉ. भगवान जनार्दन शेलटे

Post a Comment

Previous Post Next Post