कामगार चळवळीपुढील आजची आव्हाने !


कामगार चळवळ आज एका अभूतपूर्व आव्हानात्मक परिस्थितीतून वाटचाल करत आहे. 1991-92 साली नवीन आर्थिक धोरण आणि त्याचाच एक भाग म्हणून वैश्विकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण आले. या घटनेला आता 25 वर्षे झाली आहेत. तर हाच तो काळ आहे ज्या काळात तंत्रज्ञान-माहिती तंत्रज्ञानाने देखील खूप मोठी प्रगती करत अनेक बदल घडून आले आहेत. हे बदल अर्थकारणापुरतेच मर्यादित राहिले नाहीत तर यामुळे एकूण जीवनशैलीच बदलली आहे; यामुळे समाजजीवन पूर्ण ढवळून निघाले आहे.

अर्थकारणात उत्पादनक्षेत्र जसे विकसित होत गेले तसा कामगारवर्ग निर्माण झाला, त्यांच्या संघटना आल्या, लढे आले. यांची उभारणी होण्यामागे त्यांची सुरक्षितता, राहणीमानातील सुधार कल्याणकारी योजना हे घटक होते; हा वर्ग राजकीय पक्षांना आधार मिळवून देत होता. त्यातून त्यांची हस्तक्षेपाची शक्ती निर्माण होत गेली व राजकारणाला आकार दिला जाऊ लागला. आज मात्र उत्पादन क्षेत्र आकुंचित होत गेले. उत्पादन क्षेत्रात तंत्रज्ञान आले. कामगारांची आवश्यकता कमी झाली तसे दुसरीकडे एकूण अर्थव्यवस्थेत उत्पादन क्षेत्राचे जे प्राबल्य होते ती जागा सेवा तसेच किरकोळ क्षेत्राने घेतली. ज्या क्षेत्रातील कामगारांना संघटित करणे कठीण होते आणि म्हणूनच त्यांचे शोषण होताना देखील त्यांच्या संघटना जोमाने उभारल्या गेलेल्या दिसत नाहीत. यामुळे कामगार संघटना क्षीण बनल्या, त्यांची वर्गीय ताकद अपेक्षेप्रत उभी राहू शकली नाही आणि म्हणूनच की काय त्यांची हस्तक्षेपाची शक्ती क्षीण होत गेली. राजकारणात कामगारवर्ग बेदखल होऊ लागला.

संघटित कामगारवर्ग सुस्थितीत आहे पण तो आत्मकेंद्री, आत्ममग्न बनला. अर्थकारणाभोवती तो फिरत राहिला. कंत्राटी कामगार, तात्पुरते कामगार, असंघटित कामगार यांच्याबाबत तो उदासीन बनला. त्याच्या वर्गीय जाणिवा बोथट बनल्या. कामगार संघटना हे एक सामाजिक संघटन आहे. वर्गीय संघटन आहे आणि म्हणून जगाकडे बघण्याचा एक वर्गीय दृष्टिकोन असला पाहिजे. व्यापक अर्थाने कामगारवर्गाचे राजकारण उभारले गेले पाहिजे. त्यात आपल्याला हस्तक्षेपाची भूमिका असली पाहिजे असे त्याला वाटेनासे झाले आणि यातूनच फॅक्टरी किंवा ऑफीसच्या दरवाज्यात तो लाल झेंडा घेऊन लाल बावट्याची जय असा पुकारा करू लागला पण तेवढ्याच सहजतेने राहतो त्या गल्लीत, कॉलनीत तो भगवा झेंडा खाद्यांवर घेऊन जय जय करू लागला. यातील विरोधाभासाकडे तो सोयीस्कर कानाडोळा करू लागला. जात-धर्म-भाषा-प्रांत यातील भावनिक आवाहन त्याला भुलवू लागले; यातून संघटित वर्ग आणि त्याची शक्ती फक्त आर्थिक मागण्यांपुरतीच उपयोगी सिद्ध झाली. या शिवाय राजकीय पक्ष तेवढ्या कामगार संघटना, याशिवाय काही स्वतंत्र कामगार संघटना, यातील कामगारांचे झालेले विभाजन वेगळेच. यातूनच आजची ही कामगार चळवळीची दुरवस्था ओढवली गेली आहे. याचा परिणाम म्हणून अनेक कामगार विरोधी कायदे एकेक करत अस्तित्वात येऊ लागले आहेत. जे नोकरीतील शाश्वती, किमान वेतन, सामाजिक सुरक्षितता हिसकावून घेत आहेत. हे आहे आजचे कठोर वास्तव!

गेल्या 25 वर्षांत राजकारणात अनेक पक्ष झाले. सत्ताधारी राजकीय पक्ष बदलले; पण या बदलात देखील एक सातत्य होते. या आर्थिक धोरणात वर-वर पाहता या राजकीय पक्षांनी एकमेकांना विरोध केला पण तो वरपांगी होता. धोरणाच्या अंमलबजावणीच्या बाबतच होता पण मुळात त्या धोरणांवर जणू त्यांचे एकमतच होते. भारतीय लोकशाही, त्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांतील दिखाव्याला आपण गेल्या 25 वर्षांपासून अनुभवत आहोत. या सत्ताधारी राजकीय पक्षाची नावं वेगवेगळी होती पण त्यांचे वर्गीय चरित्र एकच होते. त्यांचे लक्षण एकच होते, आहे. आजच्या सत्ताधारी पक्षाचा किंवा पंतप्रधानांचा देखील त्यास अपवाद नाही.

आज छोटा शेतकरी या धोरणांच्या ज्वालेत होरपळून निघाला आहे आणि म्हणूनच किमान या शतकातील सगळ्यात मोठी शोकांतिका म्हणजे लाखो शेतकर्यांनी केलेल्या आत्महत्या आपण अनुभवत आहोत. शेतमजूर त्याला अपवाद नाही. असंघटित क्षेत्रातील कामगार महागाईत होरपळून निघाला आहे. संघटित क्षेत्रातील कामगारांना असंघटित क्षेत्रात ढकलले जात आहे. संघटित क्षेत्रातील कामगार विस्थापित बनू लागला आहे. त्याचं सुरक्षा कवच हिरावून घेतलं जात आहे. याचाच अर्थ सामान्यजणांचं जिणं हालाखीचं बनत आहे. त्याच्या जगण्यातला पेचप्रसंग अधिकाधिक बिकट बनू लागला आहे.

अर्थव्यवस्थेत दर दिवशी वाढत जाणारी आर्थिक विषमता, रोजगाराविना सततचा विकास, नैसर्गिक संसाधनांची होणारी वाढती लयलूट यातून मानवी जीवन आज ज्वालामुखीच्या तोंडावर जाऊन बसण्याइतपत स्फोटक बनले आहे. प्रश्न आहे, या वास्तवाला, असंतोषाला, जनक्षोभाला आयाम देण्याची आवश्यकता आहे. ती यासाठी कुठलीही सुरुवात करण्यापूर्वी इतिहासातील चुका सुधारून नव्याने प्रयत्न करण्याची. आजही सार्वत्रिक अनुभव एकच आहे. कामगार, कर्मचार्यांना सुरक्षित-सुस्थिर जीवन मिळेपर्यंत तो लाल बावट्याबरोबर असतो पण नंतर मात्र तो भरकटतो; यासाठीच आवश्यकता आहे ती कामगारांमध्ये वर्गीय जाणीव निर्माण करण्याची; त्यांना राजकीय शिक्षण देण्याची; सामाजिक-सांस्कृतिक जाणिवांबाबत जाणते प्रयत्न करून त्यांचे पोषण करण्याची तर आणि तोच कामगार हा परिवर्तन-क्रांतीचा अग्रदूत बनू शकेल, संघटित कामगार वर्गावर एक ऐतिहासिक जबाबदार आहे. ती असंघटितांना संघटित कारण्याची. वास्तवात संघटित कामगारवर्ग संख्येने खूप कमी आहे आणि असंघटित कामगार वर्ग संख्येने मोठा आहे तसा तो विस्कळीत देखील आहे. ज्याला संघटित करणे हे एक फार मोठे आव्हान आहे. हे करत असताना सतत आपल्याला भान ठेवावे लागेल ते या संघटित आणि असंघटित कामगारांमधील संबंधांकडे. ज्यांची भूमिका ही सतत परस्परांना पूरकच असली पाहिजे.

संघटित कामगार आज आत्ममग्न झाला आहे, त्या ऐवजी आवश्यकता आहे ती त्याला आत्मपरीक्षण करायला लावण्याची. संघटित कामगार म्हणजे बेजबाबदार, कामचुकार अशी त्याची प्रतिमा बनता कामा नये; यासाठी कार्यसंस्कृतीत सुधार घडवून आणण्याचा प्रयत्न देखील जरूर व्हायला हवा, अन्यथा संघटित कामगार चळवळीकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन हा हेटाळणी करणारा मात्र बनतो. तसेच संघटित कामगार चळवळीने समाज-सामान्य माणूस याचं भान ठेवलं पाहिजे. त्या उपयोगी अनेकविध उपक्रम, पुढाकार घेतले पाहिजेत. त्यांच्या उपयोगी सिद्ध झाले पाहिजे. स्वत:चे प्रश्न सोडवून घेताना कंत्राटी बाह्यस्त्रोत (आऊट सोर्सिंग) कामगारांचे, त्यांच्या प्रश्नाचे भान ठेवले पाहिजे. चळवळीत हितसंबंध निर्माण होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. कार्यकर्त्यांनी सतत आपल्या भोवतीच्या घडामोडींबाबत, बदलांबाबत भान ठेवले पाहिजे व वर्गीय दृष्टिकोनातून जगाकडे बघायला शिकले पाहिजे. संघटनेचा आधार हा तिचा विचार आहे हे लक्षात घेता त्या विचारांची जपणूक, त्याचे भरणपोषण यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले गेले पाहिजेत. यातून कामगार-वर्ग-चळवळ स्वत:ची ओळख निर्माण करू शकणार आहे. तसे समाजासाठी आजची उपयोगिता सिद्ध करू शकणार आहे. यातूनच कामगारवर्गाला हस्तक्षेपाची शक्ती मिळू शकणार आहे. ही कामगार चळवळीपुढील आजची आव्हाने! ज्यावर मात करूनच चळवळीला शक्ती मिळू शकणार आहे. यातूनच आजघडीच्या बिकट परिस्थितीवर मात करणे शक्य होणार आहे.

- देविदास तुळजापूरकर (9422209380)

Post a Comment

Previous Post Next Post