राजकारणातील संत : माजी खासदार कॉम्रेड सुदामकाका देशमुख




कॉम्रेड सुदामकाका देशमुख हे नाव त्याग, कष्ट, जिद्द, निष्ठा व संघर्षाचेच दुसरे नाव आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सुदामकाका देशमुख यांनी अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे दोन वेळा व अमरावती लोकसभा मतदारसंघाचे एक वेळा प्रतिनिधित्व केले. सुदामकाका देशमुख यांचे जीवन हे असाधारण व इतिहासात सुवर्णअक्षरांनी कोरले जावे असेच आहे. सुदामकाकांनी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी व समाजवादी भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी घरादारावर तुळशीपत्र ठेवले.
सुदामकाका हे जीवनाच्या अखेरपर्यंत अविवाहित राहिले. सुदामकाका देशमुख यांनी कूळ कायद्याचा प्रश्न लावून धरला आणि त्यांच्या प्रयत्नाने हजारो शेतकऱ्यांना जमिनी मिळाल्या. आदिवासींचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी धारणी-मेळघाट भाग पिंजून काढला. संपूर्ण परिसर पायाखाली तुडवून त्यांनी आदिवासींच्या प्रश्नांची बारीक सारीक माहिती घेऊन लढा दिला. शेतमजुरांना काम मिळावे यासाठी त्यांनी रोजगार हमी योजनेच्या कायद्याचा सातत्याने पाठपुरावा केला. एस.टी. कामगारांच्या लढ्याचे नेतृत्व त्यांनी केले. कापूस एकाधिकार योजना सुरू राहावी यासाठी लढा दिला.

अचलपूरच्या गिरणी मिलचा लढा सुदामकाकांच्या लढ्याचा प्रमुख भाग होता. गिरणी कामगारांना न्याय देण्यासाठी सुदामकाका देशमुख यांनी प्रचंड त्याग व संघर्ष केला. अशा छोट्या-मोठ्या लढ्यातून सुदामकाका देशमुख हे लोकनेते ठरले. कोणत्याही  खेड्यात, गावात पायी जाणे, अनवाणी पायाने चालणे, अतिशय साधी राहणी, पायात चप्पल नाही, कधी मडके तर कधी फाटके कपडे परिधान करून, आहे त्या परिस्थितीत सतत लोकांमध्ये मिसळत राहणे, जाहीर सभा घेणे, जागृती करणे, मोर्चे काढणे, निवेदने देणे हे सुदामकाकांच्या कार्याचे वैशिष्ट्य ठरले होते. अतिशय साध्या व गावरान मराठी भाषेत, वऱ्हाडी बोलीच्या शैलीत भाषण देणे व लोकांना हसवून त्यांच्या दुःखाची, वेदनांची मांडणी, लोकांना संपूर्ण भाषण होईपर्यंत खिळवून ठेवणे ही सुदामकाकांची वैशिष्ट्ये होती.

सुदामकाका देशमुख हे सर्वसामान्य माणसाच्या गळ्यातील ताई होते. पैशाचा, संपत्तीचा कोणताही मोह नसणे हे त्यांच्या जीवनाचे वैशिष्ट्य होते, म्हणून त्यांना राजकीय संत म्हणून देखील संबोधले जात होते. "आमचे गाडगेबाबा" अशी उपाधी त्यांना दिली गेली होती. सुदामकाकांचे व्यक्तिमत्व हे विसाव्या शतकातील अजब रसायन होते. त्यांच्या जीवनाची व कार्याची त्यामुळेच सर्वत्र चर्चा होत होती. त्यामुळे सुदामकाका देशमुख आज जाऊन 23 वर्ष झाल्यानंतरही ते लोकांच्या अंत:करणात घर करून बसले आहेत. ज्यांनी-ज्यांनी सुदामकाका देशमुख यांना पाहिले, त्यांचे जीवन अनुभवले ते आजही त्यांच्या जीवनशैलीने प्रभावित आहेत. असा अवलिया होणे नाहीअशाप्रकारे प्रतिक्रिया लोक देतात.

लोकनेते सुदामकाका देशमुख यांचे पूर्ण नाव वामन दत्तात्रय देशमुख असे होते. त्यांच्या आईचे नाव उमाबाई होते. अचलपूर तालुक्यातील दोनोडा खैरी या गावी 30 एप्रिल 1923 रोजी त्यांचा जन्म झाला. दोंनोडा हे गाव त्यांच्या मामाचे गाव होते. त्यांचे मुळगाव हे अमरावती जिल्ह्यातील बडनेरा होते. त्यांचे वडील दत्तात्रय देशमुख हे बडनेरा येथील विजय मिलमध्ये कामगार होते. स्वातंत्र्य चळवळ न भरात असताना अवघ्या 20 वर्षाचे वय असलेले सुदामकाका देशमुख यांच्यावर स्वातंत्र्य चळवळीचा प्रचंड प्रभाव निर्माण झाला. अमरावती येथील न्यू हायस्कूलमध्ये सुदामकाका देशमुख यांचे दहावीपर्यंत शिक्षण झाले. त्यानंतर त्यांनी समाजकार्यामध्ये स्वत:ला झोकून दिले.

ड. प्पासाहेब ब्रह्म यांच्या कुटुंबाशी त्यांचा परिचय झाला. त्यानंतर ते एकप्रकारे त्यांच्या कुटुंबाचे अविभाज्य अंगच बनले. सीताबाई व आप्पासाहेब यांनी काकांच्या तरुण अवस्थेमध्ये डॉक्टर दिवाणजी, मालिनीबाई दिवाजी यांच्या छत्रछायेखाली सुदामकाका देशमुख यांची मुख्य जडणघडण होऊ लागली. 1942 ते 43 च्या काळात अमरावती जिल्ह्यात कम्युनिस्ट आंदोलन, कामगार संघटना, किसान सभा, यामध्ये सुदामकाका देशमुख यांनी हिरिरीने भाग घेतला. त्यावेळी कॉम्रेड बाबुराव मुळे, हरगोविंद कुंडे, सुमेरसिंग नाहटे, कॉम्रेड मधुकर इंगळे, डॉ. दिवाणजी नथुजी मंगळे-गिरगावकर काका, दत्तात्रय पाटील, भीमराव निचत इत्यादी कार्यकर्ते पक्षात सक्रियपणे कार्यरत होते. त्यांचे सहकारी म्हणून सुदामकाका देशमुख यांनी आपल्या कार्याला पुढे नेण्याची वाटचाल केली.

१९४२ साली टिमटाला कट खटल्यात सुदामकाका देशमुख यांना इंग्रजांनी जबरदस्तीने तुरुंगात डांबले. 1942 ते 1945 या काळात कम्युनिस्ट पक्षावर बंदी होती. सर्व कार्यकर्त्यांना जेलमध्ये डांबण्यात येत होते. त्याकाळातही सुदामकाका यांनी गिरणीमधून पक्षाचे काम भूमिगत राहून केले. 1947-48 दरम्यान विदर्भातील कामगारांचा संप झाला. त्यात प्रामुख्याने सुदामकाकांनी हिरीरीने भाग घेतला. लालबावटा संघटनेमध्ये नेतृत्व केले. संघटनेचे नेतृत्व समर्थपणे करून कामगारांना न्याय दिला. सुदामकाकांनी अनेक वर्षे भूमिगत राहून कम्युनिस्ट पक्षात कार्य केले. 1948 मध्ये एसटी कामगारांच्या अधिवेशनामध्ये मुख्य प्रवर्तकाची भूमिका सुदामकाकांनी बजावली. सुदामकाका देशमुख यांची युनियन फोडण्यासाठी त्यावेळी काँग्रेसने पुढाकार घेतला व प्रतिस्पर्धी युनियन अचलपूर गिरणी कामगार संघटना स्थापन केली. त्यामध्ये काँग्रेसच्या लोकांनी मालकाशी साटेलोटे करून सुदामकाका यांच्या चळवळीला खिळखिळी करण्याचा प्रयत्न केला गेला.

कुळ कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी सुदामकाकांनी आंदोलनाला गती दिली. १९५२ मध्ये विधानसभेमध्ये प्रामुख्याने कुळ कायदा पास झाल्यानंतर कुळाच्या जमिनी शेतकऱ्यांना मिळू नये, यासाठी जमीनदारांनी हेराफेरी व सातबाऱ्यामध्ये बदल करण्यासाठी खोटी कागदपत्रे तयार करण्यासाठी हालचाली केल्या. त्यावेळी हा डाव उधळून लावण्यासाठी सुदामकाका देशमुख यांनी गावोगावी, खेडोपाडी जाऊन पदयात्रा काढली व शेतकऱ्यांना जागृत केले. त्यांना याबाबतचे सर्व नियम समजावून सांगितले. शेतकऱ्यांना वकिलाची जी फी भरावी लागत होती, त्यापासून शेतकऱ्यांची सुटका केली. हजारो शेतकऱ्यांना सुदामकाकांच्या प्रयत्नामुळे जमिनी मिळाल्या.

सुदामकाका देशमुख यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्याचे नेते म्हणून काम केले.  भारतीय शेतमजूर युनियनच्या पंजाब प्रांतातील मोगा येथील पहिल्या राष्ट्रीय अधिवेशनात प्रतिनिधी म्हणून त्यांनी भाग घेतला व शेतमजुरांच्या चळवळीमध्ये सहभाग घेऊन शेतमजुरांचे प्रश्न देशाच्या पातळीवर गाजवले. त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. 1972 साली प्रचंड दुष्काळ पडला. त्यावेळी मजुरांना अन्न नव्हते. हाताला काम नव्हते. त्याप्रसंगी सुदामकाकांनी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गिट्टीखदानचे काम सुरू करून अनेक ठिकाणी मजुरांच्या हाताला काम दिले. 50 किलोमीटर पर्यंत पायी चालत जावून मोर्चे काढले. सुदामकाका देशमुख हे कामगार, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर चळवळीचे चालते बोलते विद्यापीठच होते.

सुदामकाकांची निवडणूक ही लोकांनीच लढवली. "तुमचाच गेरू आणि तुमचाच चुना, सुदामकाकाला निवडून आणा" हा नारा लावून, जनतेने स्वतः लोकवर्गणी जमा करून सुदामकाकांनी निवडणूक लढवली. 1952 आणि 1957 या दोन विधानसभा निवडणुकीत सुदामकाका देशमुख यांना पराभव पत्करावा लागला. त्यांना काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. 1962 च्या विधानसभा निवडणुकीत संयुक्त महाराष्ट्र समितीच्या माध्यमातून अमरावती जिल्ह्यात चार उमेदवार निवडून आणले. त्यानंतर सुदामकाका देशमुख हे अचलपूर विधानसभा मतदारसंघातून भोकरे यांच्याविरोधात विजयी झाले. त्यानंतरच्या निवडणुकीत त्यांनी पुन्हा काँग्रेसचे उमेदवार सुनील देशमुख यांचा पराभव करून विजय संपादन केला.

1989 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी इतिहास घडवला. त्यांची संपूर्ण निवडणूक जनतेने डोक्यावर घेतली. संपूर्ण लोकसभा मतदारसंघात जनताच उमेदवार बनली व स्वतः प्रचार केला. अनेक ठिकाणी धोतरावर बॅनर तयार करण्यात आले. सुदामकाका देशमुख ज्या गावात जात असत, त्यादिवशी लोक मजुरीला न जाता गावात सुदामकाकांची वाट पाहत असत. त्यांच्या सभेला अलोट गर्दी उसळत होती. सुदामकाका देशमुख यांनी काँग्रेसचा उमेदवार उषाताई चौधरी यांचा 1 लाख 40 हजार मताधिक्याने पराभव केला व ते लोकसभेत पोहचले. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून त्यांनी विदर्भातून पक्षाचे खाते उघडले. त्यांना सर्व स्तरातून पाठिंबा मिळाला. शोषित, पीडित, श्रमिक दलित, मुस्लिम सर्व जाती-धर्माच्या लोकांनी त्यांना अक्षरशः डोक्यावर घेतले. सर्व पक्षातील लोकांनीही त्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत केली. एक नवा इतिहास घडवला. निवडून येण्यासाठी आज लोकांना जातीचा, धर्माचा, भाषेचा, प्रांताचा, पैशाचा, दारूचा, दिशाभूल करण्याचा, धमकीचा, दहशतीचा वापर करावा लागतो. मात्र सुदामकाकांना जनतेने प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, परिश्रम, पैसा सर्व देऊन लोकशाहीमध्ये एक नवा अध्याय लिहिला. भ्रष्टाचारी मार्गाचा वापर करून निवडून येणाऱ्या दूषित परंपरेला या रूपाने नवा आयाम दिला.

सुदामकाका जेव्हा अचलपूर विधानसभा मतदारसंघात विजयी झाले तेव्हा पक्षाच्या चावल मंडी येथील कार्यालयात जनतेने अभिनंदनाचा वर्षाव करण्यासाठी पोस्टकार्डद्वारे पत्रांचा वर्षाव केला. हे जनतेचे आगळेवेगळे प्रेम होते. सुदामकाका त्यांना मिळणाऱ्या देणगीतून पक्ष कार्यकर्त्यांनादेखील अल्पसे मानधन मनीऑर्डरद्वारे देत होते. त्यामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते कॉम्रेड जानराव मंडवधरे यांचादेखील समावेश होता.

सुदामकाका देशमुख यांनी अहोरात्र केलेले कष्ट, झालेली त्यांची शारीरिक व मानसिक झीज यामुळे ते प्रचंड थकले होते. त्यातच त्यांना कर्करोगासारख्या दुर्धर आजाराने ग्रासले. दमदार वक्तृत्व शैलीने जनतेला खिळवून ठेवणारे, त्यांच्या मनाची पकड घेणारी ही लढाऊ तोफ आता शांत झाली होती. त्यांना मुंबई येथे उपचारासाठी भरती करण्यात आले. ते बिछान्यावर खिळल्यामुळे ते लोकांची सेवा करू शकत नव्हते, याचे शल्य त्यांना होते. ते कुणासमोर आपले दुःख व्यक्त करु शकत नव्हते. भिंतीकडे पाठ फिरवून जनतेला अश्रू न दाखवता दुःख व्यक्त करत होते. अखेरच्या क्षणापर्यंत ते लोकांसाठी लढत होते. झिजत होते. संघर्ष करत होते. ते अखेरच्या क्षणापर्यंत भाड्याच्या घरातच राहिले. त्यांना स्वतःचे घर नव्हते. कोणताही बँक बॅलन्स नाही. कोणती संपत्ती नाही. असा अवलिया राजकारणी पुन्हा होणे नाही. अशा क्रांतिकारक सुदामकाकांची प्राणज्योत 14  मे 1993 रोजी रात्री ठीक दहा वाजून 15 मिनिटांनी मालवली. अनाथांचे नाथ या जगातून निघून गेले. मात्र त्यांचे कार्य जनतेच्या मनावर कोरले गेले आहे. त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याची गरज आहे. आजही समाजातील शोषण, दुःख, दारिद्र्य, विषमता, अन्याय-अत्याचार, जातीयवाद, धर्मांधता, अंधश्रद्धा हे प्रश्न सुटलेले नाहीत; नव्हे त्यामध्ये भरच पडली आहे. त्यामुळे आजही सुदामकाकांच्या विचाराला पुढे नेण्याची गरज आहे. त्यांच्या कार्याला, त्यांच्या इतिहासाला उजाळा देण्याची गरज आहे. नवी पिढी पुन्हा सुदामकाकांच्या कार्याचे अध्‍ययन करेल, प्रेरणा घेईल व त्यांच्या मार्गावर वाटचाल करेलनवा समाजवादी भारत घडविण्यासाठी! हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे.

- संजय मंडवधरे
जिल्हा सचिव, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, वाशीम

Post a Comment

Previous Post Next Post