कॉम्रेड अतुलकुमार अंजान यांना अखेरचा लाल सलाम..!

दोन दिवसांचा दुखवटा पाळण्याचे राज्य सेक्रेटरी कॉ. ॲड. सुभाष लांडे यांचे आवाहन



मुंबई : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव, तसेच अखिल भारतीय किसान सभेचे महासचिव कॉम्रेड अतुलकुमार अंजान यांचे आज (४ मे) दीर्घ आजाराने निधन झाले. उद्या दिनांक ४ मे रोजी दुपारी लखनौ येथे त्यांचा अंत्यविधी होणार आहे. त्यांना भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्र राज्य कौन्सिलच्यावतीने भावपूर्ण आदरांजली.. अखेरचा लाल सलाम..!

 

कॉम्रेड अतुलकुमार अंजान यांच्या निधनामुळे कम्युनिस्ट पक्षाचे व किसान सभेचे फार मोठे नुकसान झाले आहे. आपल्या प्रिय नेत्यास आदरांजली वाहण्यासाठी पक्षाच्या ऑफिसवरील पक्ष ध्वज अर्ध्यावर घेऊन दोन दिवस दुखवटा पाळण्यात यावा, असे आवाहन पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉ. ॲड. सुभाष लांडे यांनी केले आहे.

 

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव, तसेच अखिल भारतीय किसान सभेचे महासचिव कॉम्रेड अतुलकुमार अंजान यांच्या निधनामुळे देशातील शेतकरी चळवळीचे मार्गदर्शक व लढवय्ये कम्युनिस्ट नेतृत्व हरपले आहे.

 

ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना देशभर दौरे करून, त्यांनी.आय.एस.एफ.च्या वाढीसाठी अथक प्रयत्न केले. अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय महासचिव झाल्यानंतर किसान सभेच्या बांधणीसाठीही त्यांनी देशभर दौरे केले. शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असलेल्या कॉम्रेड अतुलकुमार अंजान यांनी त्यांच्या आजारपणातही दिल्ली येथे १३ महिने झालेल्या किसान आंदोलनाला सतत मार्गदर्शन केले व देशभरातील किसान कार्यकर्त्यांना यात सहभागी होण्यासाठी प्रयत्न केले.

 

त्यांच्या या प्रयत्नामुळेच दिल्लीच्या सहा सीमांवर झालेल्या १३ महिन्यांच्या किसान आंदोलनात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातून कॉम्रेड दिवंगत नामदेव गावडे यांच्या नेतृत्वाखाली काही जत्थे दिल्लीच्या सीमांवरील या आंदोलनात सहभागी झालेले होते.

 

स्वामिनाथन आयोगाचे सदस्य म्हणून त्यांनी महत्त्वपूर्ण काम केलेले होते. शेती व शेतकरी यांच्या संबंधाने महत्त्वाच्या शिफारशी करणारा मसूदा तयार करताना त्यांची महत्वाची भूमिका होती. भारतीय इतिहासाची खोलवर जाण, जागतिक घडामोडींची जाण असलेले अतुलकुमार अंजान फर्डे वक्ते म्हणूनही प्रसिद्ध होते.

 

महाराष्ट्रातील जिल्ह्याजिल्ह्यातील कम्युनिस्ट पक्षाच्या व किसान सभेच्या कार्यकर्त्यांशी त्यांचे संबंध होते. किसान सभेच्या व पक्षाच्या अनेक कार्यक्रमांसाठी अनेक वेळा ते महाराष्ट्रात येत असत. मुंबईतील फिल्म इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज अभिनेते व साहित्यिकांशीही त्यांचे घनिष्ठ संबंध होते.

 

लढवय्या किसान व कम्युनिस्ट नेता दूर्धर आजाराने हिरावून घेतल्यामुळे भारतातील कम्युनिस्ट व किसान आंदोलनाचे निश्चितपणे मोठे नुकसान झाले आहे. लढवय्या व अभ्यासू, संघर्षशील अशा कम्युनिस्ट नेत्यास भावपूर्ण आदरांजली. कॉम्रेड अतुलकुमार अंजान लाल सलाम !

Post a Comment

Previous Post Next Post