क्युबाच्या सँटिऍगो शहरात चौथीत
शिकणाऱ्या काटकुळ्या पोराचं सातवीत शिकणाऱ्या बलदंड पोराबरोबर एके दिवशी भांडण
झालं. बलदंड पोरानं काटकुळ्या पोराला
निभार मारलं. किरकोळ शरीरयष्टी असणारं ते पोरगं रडत घरी आलं आणि अस्वस्थ झालं. दुसऱ्या दिवशी ते काटकूळं पोरगं
शाळेत गेल्याबरोबर त्या धडधाकट पोराच्या पुन्हा अंगावर गेलं आणि त्याला मारायचा
प्रयत्न करू लागलं. ताकद कमी पडल्यामुळे दुसऱ्या दिवशीही मार खाऊन ते परत आलं. पण
ते कधीच हार मानायला तयार नव्हतं. मग सलग तिसऱ्या,
चौथ्या आणि पाचव्या दिवशीही तेच काटकूळं पोरगं रोज शाळेत जात होतं
आणि आपल्यापेक्षा मोठ्या असलेल्या पोराला मारायचा प्रयत्न करत होतं. अखेर ते
सातवीतलं मोठं पोरगं कंटाळलं आणि काटकुळ्या पोराचा नाद
सोडून निघून गेलं. सरतेशेवटी काटकूळं पोरगंच जिंकलं.
ह्या काटकुळ्या पोरानं वयाच्या दहाव्या वर्षी जसे
आपल्यापेक्षा ताकदीने मोठ्या असणार्या पोराला नमवलं होतं, तसंच वयाच्या तिसाव्या वर्षी बलाढ्य अमेरिकेचा सहारा असणाऱ्या बॅटिस्टा
नावाच्या हुकूमशहाला नमवलं होतं आणि ते पोरगं क्युबाचा राष्ट्राध्यक्ष झालं होतं.
ते प्रयत्नांना पराकष्ठेची जोड देणारं महत्वाकांक्षी पोरगं
होतं, फिडेल कॅस्ट्रो.
विसावे शतक हे जगातल्या अनेक
महत्त्वाच्या घटनांनी गजबजलेलं होतं. या शतकाने जगाला आभाळ कवेत घेऊन काळाला थोपवणारी
आणि इतिहासालाही दखल घ्यायला लावणारी अनेक माणसं दिली. यात लढणारा,
जिंकणारा आणि मेल्यानंतरही न संपणारा माणूस म्हणजे फिडेल कॅस्ट्रो. 1954
साली फिडेल कॅस्ट्रो या विद्यार्थ्याने आपल्या समवयस्क पोरांना गोळा
करून क्युबात क्रांतीची चळवळ सुरू केली आणि ध्येयाने पेटलेल्या या तरण्याबांड
पोरांनी थेट बॅटिस्टाची सत्ता उलथवून टाकण्याचा असफल
प्रयत्न केला. पहिला प्रयत्न फसल्यावर त्यांना नाईलाजाने मेक्सिकोत निर्वासित
म्हणून जावं लागलं. पण ही शांत बसणारी पोरं नव्हती. यांचा जरी प्रांत बदलला होता
पण तो त्यांचा अंत मात्र कधीच नव्हता. कारण "एक तर हिरो बनू किंवा हुतात्मे
ठरु, पण शेवटपर्यंत लढू" असे सांगणारा फिडेल कॅस्ट्रो
त्यांचा नेता होता.
त्यांनी पुन्हा दुसरी योजना आखली. 'ग्रेनमा'
या सतरा लोकांची क्षमता असणाऱ्या लाकडी बोटीत फिडेल सह 83 जण दाटीवाटीने बसले आणि क्युबावर आक्रमण करायला निघाले. तब्बल सात
दिवसांच्या प्रवासानंतर ते क्युबात पोचणार होते. पण याची खबर आधीच बॅटिस्टाला
लागली होती, त्यामुळे "ग्रेनमा"
किनाऱ्यावर लागताच क्युबन सैनिकांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला.
बंडखोर पोरं सैरावैरा पळू लागली. त्यातच दुष्काळात तेरावा म्हणून दलदलीच्या
प्रदेशात फसली. गोळीबारात वाचलेली काहीजण गाळात रुतून
मेली. त्र्याऐंशी पोरातली फिडेलसह फक्त 11 पोरं वाचली.
पण ती 11 पोरं कधीच मागे हटली नाहीत किंवा वाटेत कुठेच थटली नाहीत. त्यांनी क्युबाच्या सिएरा मिस्त्रा
या डोंगर भागात राहून गुरीला युद्ध सतत चालू ठेवले. त्यांच्या खडतर लढ्याला 1960
साली यश आले. तेव्हा त्यांनी आपल्या
म्होरक्याला राष्ट्राध्यक्ष केले आणि फिडेल कॅस्ट्रो
नावाचे नवे पर्व जगात उदयास आले.
परिस्थिती माणसाला बदलते आणि माणूस परिस्थिती
बदलवतो. याप्रमाणे फिडेलने सत्तेवर
आल्यानंतर अनेक संकटांना आव्हान देत क्युबाला आतून-बाहेरून पूर्णपणे बदलून टाकले.
क्युबा हा शेतकरी, खेड्यांचा देश. या देशात
फिडेलने समाजवादी क्रांतीचे स्वप्न पाहिलं आणि ते पूर्णत्वाला नेलं, कारण त्याच्याकडे चालणारे पाय होते. स्वप्नापासून
वास्तवापर्यंत जाणारे रस्ते पायांसाठी तयार होते. देशाचा नेता रुबाबदार, आत्मसन्मानी, स्वप्नाळू पण तितकाच वास्तववादी असेल तर त्याच्यासाठी जनता जीव द्यायलाही तयार होते.
फिडेलवर क्युबाच्या जनतेने इतका जीव लावला होता, की
कोणत्याही संकटात क्युबा त्याच्यासोबत असायचा. फिडेल कॅस्ट्रो म्हणजे क्युबा आणि क्युबा म्हणजेच फिडेल कॅस्ट्रो असे
समीकरण तयार झाले होते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे
मार्क्सकडे जसा फ्रेडरिक एंगल्स होता, लेनिनकडे ट्रॉटस्की
होता, तसेच फिडेलकडे मरायलाही तयार असणारा चे गव्हेरा होता
म्हणूनच फिडेल जिंकला. बॅटिस्टा विरुद्धच्या लढाईत
यशस्वी झाला आणि क्युबाचा तरुण तडफदार राष्ट्राध्यक्ष झाला.
अमेरिकेने कोरोनाला हरवायला जेवढे
प्रयत्न केले नसतील, त्याच्यापेक्षा जास्त प्रयत्न क्युबाला मोडून काढण्यासाठी
केले होते. तरीही क्युबा आज ताठ मानेने जगात उभा आहे. मग
क्युबा का संपला नाही? याचं उत्तर शोधायचं झाल्यास ते
फिडेलने क्युबात राबवलेल्या धोरणात सापडेल. आज अमेरिकेत
साक्षरतेचे प्रमाण 99% आहे, पण क्युबात
हेच प्रमाण 99.8% आहे. क्युबाची सरासरी आयुर्मर्यादा 80
वर्ष आहे. क्युबात बालमजूर शोधूनही सापडत नाहीत, तर एकही भिकारी कुठेच दिसत नाही. लसीकरणाची सोय क्युबात शंभर टक्के
उपलब्ध आहे. बालमृत्यूचे प्रमाण जगात सर्वात कमी कुठे असेल तर ते क्युबामध्ये आहे.
कुपोषित बालके क्युबात अस्तित्वातच
नाहीत. जनतेला सहज उपलब्ध होणारे आणि प्रक्रिया केलेले पेयजल क्युबात 97 टक्के आहे. संपुर्ण क्युबात एड्सचे पेशंट बोटावर मोजण्याइतपत आहेत. दर
हजारी चार डॉक्टर आहेत आणि हे प्रमाण अमेरिका, इस्राईल,
जपानपेक्षा जास्त आहे.
फिडेल कॅस्ट्रोने क्रांती करून
क्युबाचा ताबा घेतला तेव्हा अमेरिकेने पसरवलेल्या उलटसुलट अफवांनी तिथले निम्मे
डॉक्टर देश सोडून अमेरिकेत पळून गेले. परंतु हे आव्हान सुद्धा फिडेलने मोठ्या
धाडसाने पेलले. वैद्यकीय शिक्षणावर त्याने इतका भर दिला की, जगात कुठेही आपत्ती आली तर पहिल्यांदा जे जगाला साथ देतात, धावून जाऊन मदतीचा हात देतात ते फक्त क्युबाचेच डॉक्टर असतात, हे आजही कोरोनाच्या काळात जगाला कळालेलं एक महान सत्य आहे.
फिडेल शत्रुपेक्षा अधिक मित्र करणारा
सुस्वभावी माणूस होता. सत्तेत आल्यावर त्याने सोविएत युनियनशी जुळवून घेतले.
अमेरिकेने क्युबाला अनेक बाजूंनी कोंडीत पकडण्याचा भरभक्कम प्रयत्न केला. इंधन
तेलाची निर्यात थांबवली गेली. देश संकटात सापडला, पण फिडेल माघार घेणारा
आणि हार मानणारा माणूस मात्र कधीच नव्हता. त्याने चीन वरून तेवीस हजार सायकली
मागवल्या. देशातील लोकांना सायकल वापरण्याचे आवाहन केले आणि स्वतः हवानातून
सायकलवरून फेरफटका मारू लागला. तेव्हा जनतेने सायकल वापराची सवयच लावून घेतली. त्यामुळे त्यांचे आरोग्य निरोगी झाले. पर्यावरणाचे संतुलन
साधले गेले. परंतु क्युबाला नमवण्याचे उद्दिष्ट अमेरिकेला काही केल्या साध्य करता
आले नाही. कारण खाचखळग्यातुन वाट काढत पुढे जाण्याचा ध्यास आणि जिंकण्याचा प्रवास
देशवासीयांना फिडेलने शिकवला होता. आपल्या मित्रराष्ट्रांचा गट त्याने जवळ केला
होता आणि अमेरिकेच्या अंगणात लाल झेंडा इतका भक्कम रोवला होता, की लागोपाठ आयसेन हॉवर पासून बिल क्लिंटन
पर्यंत अकरा अमेरिकन अध्यक्षांनी जंग जंग पछाडूनही या लाल झेंड्याची
फडफड थांबवता आली नाही.
फिडेलने प्रचंड मेहनत घेऊन क्युबातील
क्रांतीला दिशा दिली. जगातील सर्वोत्कृष्ट आरोग्यसेवा त्याने क्युबात तयार केली. जगातल्या 68 देशांत 30 हजार डॉक्टर्स पाठवले आणि सहा लाख मोहिमा हाती घेतल्या. विकसनशील देशांतील
होतकरू तरुणांना क्युबात फुकट वैद्यकीय शिक्षण दिले. अमली पदार्थांची समस्या समूळ
नष्ट केली. फिडेलने केलेल्या क्रांतीमुळे अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांचे हितसंबंध
धोक्यात आले. फिडेलने धडाक्यात बहुराष्ट्रीय
कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण केले. तेव्हापासून क्युबा अमेरिकेला काट्यासारखा सलायला लागला. मात्र फिडेलने
धीर न सोडता अमेरिकेच्या दादागिरीशी मुकाबला चालूच ठेवला. पन्नास वर्षे व्यापार
बंदी व आर्थिक नाकेबंदीला तो यशस्वीरीत्या तोंड देतच राहिला. आयुष्यभर संघर्षाला
कवटाळत विजयाची पताका उंचावतच राहिला आणि जगाच्या इतिहासातील आश्चर्यकारक माणूस
ठरला हि साधीसोपी गोष्ट नाही.
एखाद्या सिनेमात व्हिलनने हिरोला
कितीही मारायचे प्रयत्न केले आणि कितीही गोळ्या लागल्या तरीही हिरो मरत नाही ही
केवळ अतिरंजितता असते. ती फक्त सिनेमातच ठीक असते. पण अमेरिकेने
फिडेलला वास्तवात 638 वेळा मारायचा प्रयत्न केला ही खरीखुरी
गोष्ट आहे. तरीही फिडेल मेला नाही, कारण त्याच्याकडे अफाट
इच्छाशक्ती होती आणि दुर्दम्य आशावाद होता. त्यामुळे तो लढतच राहिला. अखेरपर्यंत
झुंजतच राहिला. सरतेशेवटी 19 फेब्रुवारी 2008 चा दिवस उजाडला. दक्षिण अमेरिकेतील क्युबा नावाच्या देशात घरातील
बारक्यापासून म्होरक्यापर्यंत सगळे टीव्ही समोर बसले होते. त्यामध्ये काही लहान
होते, म्हातारे होते, शेतात काम करणारे
होते, नोकरदार होते, गरिबातले
गरीब होते आणि श्रीमंतही होते. तब्बल सात तास कोणी टीव्हीसमोरून
उठायला तयार नव्हतं. त्यावेळी टीव्हीवर हॉलिवूडचा गाजलेला चित्रपट लागला नव्हता.
क्रिकेटचा सामना नव्हता किंवा कोणताही रिऍलिटी शो नव्हता, तर
क्रांती करून यशस्वी झालेल्या फिडेलचे ते निवृत्तीपर भाषण होते, की जे ऐकण्यासाठी अख्खा देश लॉकडाउन सारखा ठप्प झाला होता. त्या भाषणाची
नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही झालेली आहे. इतका
फिडेल लोकप्रिय माणूस होता. लोकांनी फिडेलवर खुप प्रेम केले आणि फिडेलने
अमेरिकेच्या कट-कारस्थानांना व दडपशाहीला भीक न घालता क्युबावर पन्नास वर्ष यशस्वी
राज्य केले.
असा हा 13 ऑगस्ट 1926 साली
क्युबात जन्माला आलेला फिडेल 25 नोव्हेंबर 2016 ला वयाच्या 91 व्या वर्षी जग सोडून गेला. त्याच्या
मरणानंतर तब्बल नऊ दिवस त्याच्या अस्थी संपूर्ण क्युबात फिरवल्या आणि नवव्या
दिवसानंतर लाखो क्युबन नागरिकांनी रस्त्यावर येऊन राऊल कॅस्ट्रोच्या नेतृत्वाखाली फिडेलला अभिवादनपर लाँग मार्च
काढला. फिडेल व्यक्तिवादी नव्हता किंवा मूर्तिपूजकही
नव्हता. त्यामुळे संपूर्ण क्युबात एकाही रस्त्याला, पुतळ्याला,
स्मारकाला, बगीचाला किंवा सार्वजनिक ठिकाणाला
फिडेलचे नाव नाही. पण तिथल्या लाखो हृदयात फिडेलचे नाव कोरले गेले आहे. तिथल्या
मातीच्या कणाकणात रुजले गेले आहे, की जे पुसून टाकणं कुणालाच
शक्य नाही. म्हणून फिडेल संपत नाही.
- मारुती शिरतोडे