कामगार चळवळीची महत्वाची कामगिरी : महाराष्ट्र राज्य निर्मिती


आज १ मे.. कामगार दिन. तसाच तो महाराष्ट्र दिन देखील आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र ही महत्वाची राजकीय घोषणा 1956 साली देण्यात आली. याचे महत्वाचे कारण मुंबई ही भारताची उद्योग राजधानी होती. एवढेच नव्हे तर नवीन महाराष्ट्रात कामगार-कष्टकरी समाज केंद्रस्थानी असावा हा आग्रह होता. त्यामुळे ‘औद्योगिक मुंबईवर कामगारांचा हक्क की भाडवशाहांचा?’ हा महत्वाचा लोकशाही लढा महाराष्ट्रातील व विशेषत: मुंबई गिरणी कामगारांनी लढविला व यशस्वी केला. म्हणूनच 1 मे हा कामगार दिन व महाराष्ट्र दिन राज्यात एकत्रित साजरा करण्यात येतो. तो निव्वळ योगायोग नव्हे, तर कामगारलढ्याची कमाई आहे. म्हणूनच महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी ‘समाजवादाचा पाळणा महाराष्ट्र राज्यात सर्वप्रथम हलला’, असे विधान केले होते.

1920 साली 31 ऑक्टोबरला मुंबई येथेच ‘आयटक’ या पहिल्या अखिल भारतीय कामगार संघटनेची निर्मिती झाली. निर्मितीपासूनच संघर्षाचे धडे कामगारांना मिळाले. 1923 साली पहिला 1 मे दिन साजरा करण्यात आला व भारताच्या संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा करण्यात आली. तेव्हापासून प्रत्येक वर्षी काँग्रेसच्या अधिवेशनात ‘आयटक’मार्फत ‘संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव करा’ म्हणून मोर्चा काढला जात होता. 1930 साली कराची काँग्रेसमध्ये पंडीत नेहरूंनी तो ठराव मांडला व मान्य झाला.

मुद्दा हा की मुंबईचा कामगार हा निर्मितीपासूनच स्वातंत्र्यलढ्याशी जोडला गेला आहे. त्याचबरोबर 1928 चा सहा महिन्यांचा संप, 1938 चा महागाई भत्ता संघर्ष, बोनस लढे व 1940 सालचा मुंबई औद्योगिक कगमार कायद्याविरूद्धचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांच्या नेतृत्वाखालचा लढा, 1946 चे नाविकांचे बंड, 1942 ची चलेजाव चळवळ, 1930 ची स्वदेशी चळवळ असा अखंड संघर्षाचा अनुभव मुंबई कामगारांच्या बरोबर होता. त्यामुळे 1956 साली भाषावार प्रांतरचना जाहीर झाल्यावर ‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र’ हा लढा कामगार चळवळीने आपला आहे, हे जाणून ‘मुंबई कोणाची? भांडवलदारांची की कामगारांची?’ हा प्रश्न उभा केला व ती कामगारांची, हे निर्णायक उत्तर दिले.

या चळवळीत 105 हुतात्मे झाले. ते बहुतांश गिरणी कामगार चळवळीशी संबंधित होते. त्यांचे स्मारक आजही मुंबई येथे हुतात्मा स्मारक म्हणून उभे आहे व या गौरवशाली लढ्याची व त्यागाची व त्याचबरोबर कामगारांच्या राजकीय पुढारीपणाची साक्ष देत आहे.

आज करोना संकटानंतर नवीन पद्धतीने समाजरचना उभे करण्याचे आव्हान आहे. ते कामगार चळवळीने स्वीकारून, नवसमाजनिर्मिती करावी हाच विचार या 1 मे या ‘करोनाग्रस्त’ कामगार दिनाच्या निमित्ताने कामगारांनी मांडावा व संघर्ष करावा ही अपेक्षा. सर्वांना 1 मे कामगार दिनाच्या व महाराष्ट्र स्थापना दिनाच्या शुभेच्छा व लाल सलाम...
- कॉम्रेड डॉभालचंद्र कानगो (संपादकसाप्ताहिक युगांतर)

Post a Comment

Previous Post Next Post