भावेश पटेल या जामीनावर
सुटलेल्या गुन्हेगाराचे त्याच्या
गावी भरूच येथे प्रचंड स्वागत झाले. त्याची
स्टेशनपासून त्याच्या घरापर्यंत प्रचंड मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत त्याचा जयजयकार करण्यात आला. फटाक्यांची आतषबाजी
करण्यात आली. भावेशवर फुलेही उधळण्यात आली. भावेश पटेल असे स्वागत ही खचितच चिंताजनक बाब म्हणता येईल. भावेश पटेल अद्याप निर्दोष झालेला नसून सध्या तो जामीनवर सुटला आहे.
असे काय केले होते भावेशने? सन 2007 सालच्या रमजान महिन्यात अजमेर येथील ख्वाजा मैनुद्दीन चिस्ती यांच्या दर्ग्यात
स्फोट घडविण्यात आला. रमजान महिना हा मुस्लीम समाजासाठी पवित्र
मानला जातो. मुस्लीम लोक या महिन्यात उपवास ठेवतात. सायंकाळी प्रार्थना झाल्यानंतर उपवास सोडण्याची प्रथा आहे. दर्ग्यात ज्यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपवास सोडण्यासाठी एकत्र आलेले होते
त्यावेळी जेवणाच्या डब्यातून आणलेली स्फोटके उडवून देण्यात आली.
हा कट रचून अमलात
आणल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती आले. यात भावेश
पटेल दोषी ठरला. सध्या तो जामीनावर आहे. ज्याने अशाप्रकारचा गंभीर गुन्हा केल्याचे शाबीत झाले आहे त्या गुन्हेगाराची
अशी मिरवणूक निघणे हे कितपत योग्य आहे? हे सारे घडत आहे.
नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमध्ये काही दिवसांपूर्वी जयंत सिन्हा या
झारखंडमधील ज्येष्ठ भाजप नेत्याने अशाच गुन्हेगारांचे आपल्या कार्यालयात पुष्पहार घालून
स्वागत केले होते. उपस्थितांचा पाहुणचार करून छोटेसे भाषणही केले
होते. या घटनेवरही खूप टीका झाली. जयंत
सिन्हा कोणता संदेश समाजाला देऊ इच्छितात असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला होता.
जेव्हा टीकेचा भडीमार होऊ लागला तेव्हा त्यांनी केविलवाणी सारवासारव
केली. या टीकेचा भाजप नेत्यावर आणि कार्यकर्त्यांवर कसलाच परिणाम
झालेला दिसत नाही. परिणाम झाला असता तर भरूचमध्ये भावेश पटेलची
अशी मिरवणूक निघालीच नसती. https://saptahikyugantar.blogspot.com/
भावेश पटेलने तुरुंगात
आपले नाव बदलून स्वामी मुक्तानंद असे केले आहे. भगवी कफनी
तो वापरतो. त्याची अशी समजूत झाली असणार की आपण भगवी कफनी घातली
तर आपली सारी पापे धुवून निघतील. गुन्हे माफ होतील. आपल्या समाजात आजही भगव्या कफनीला मान आहे. पण जेव्हा
भावेश पटेलसारखे लोक भगवी कफनी वापरतात तेव्हा ते तिचा अपमानच करतात. स्वामी विवेकानंदांनी भगवी कफनी जगभर नेली. त्यांनी भगव्या
कफनीला त्यागाचे प्रतिक मानले. आपले तत्त्वज्ञान जनमनात उतरविण्यासाठी
त्यांना भगवी कफनी वापरणे योग्य वाटले. स्वामी अग्निवेश हे भगवी
कफनी धारण केलेले सामाजिक कार्यकर्ते आहेत. ते सामाजिक सुधारणांचा
आग्रह धरतात. समाजात चाललेल्या शोषणाच्या विरोधात ते बोलतात.
महिलांवर होणार्या अन्यायाच्या विरोधात ते उभे
राहतात. बाल मजूरीविरुद्ध आंदोलने करतात अशा अग्निवेश यांना भगवी
कफनी शोभून दिसते. भावेश पटेलसारखे गुन्हेगार जेव्हा भगवी कफनी
वापरतात तेव्हा ते त्या कफनीचा एकप्रकारे अपमानच करतात. म्हणून
ते आक्षेपार्ह आहे. भगवी कफनी वापरत, आपण
संन्याशी आहोत असे भासवत समाजातील गरीब लोकांचे आणि विशेष करून महिलांचे शोषण करणारे
अनेक भोंदूबाबा आपल्याकडे पाहायला मिळतात. तेसुद्धा भगव्या कफनीचा
अवमानच करतात हे ध्यानात घ्यावयास हवे.
आपल्या पक्षातील कार्यकर्ते
जेव्हा एखाद्या गुन्हेगाराचे असे समर्थन करतात तेव्हा ज्येष्ठ नेत्यांनी हस्तक्षेप
करून असे प्रकार थांबवावयास हवेत. पण असे प्रकार जेव्हा
होतात तेव्हा भाजपमधील ज्येष्ठ नेते मंडळी त्याकडे चक्क दुर्लक्ष करतात. असे करून ते या प्रकाराला मूक संमती देतात. कधी कधी तर
अशा कार्यक्रमांना पडद्याआडून पाठींबा देतात. त्यामुळे हुल्लडबाजी
करणारे जे असतात त्यांना आपोआपच प्रोत्साहन मिळते. त्यामुळेच
तर अल्पसंख्यांक आणि दलित यांच्यावरील अत्याचार वाढत चाललेले आहेत. एखाद्यावर गाय पळवल्याचा आरोप ठेवत दुसर्यावर म्हैस
चोरल्याचा आरोप ठेवत; तिसर्यावर असाच आणखी
काही आरोप ठेवून त्यांना भर रस्त्यावर ठेचून मारण्याचे प्रकार दिवसाढवळ्या घडत आहेत.
आम्हाला कोण विचारतो अशी एक भावना या लोकांच्या मनात निर्माण झाल्याची
दिसते. अशा ठेचून मारण्याच्या प्रकरणात साक्ष देण्यासाठी कोणी
पुढे येताना दिसत नाही. तसेच पोलिसांची अशा प्रकरणातील निष्क्रियताही
गुन्हेगारांना मदत करणारीच ठरताना दिसते. हे असे करण्यास लोक
का प्रवृत्त होतात? असे एकदम घडते का? तर
नाही. खासगी बैठकीत, लहान लहान सभांतून
मौखिक प्रचाराद्वारे एका समाजाच्या विरोधात वातावरण कलुषित करण्यात येते. अमूक अमूल लोकांना आपण मारलेच पाहिजे अशी मानसिकता तयार करण्यात येते.
जेव्हा आपले राज्य येईल तेव्हा या लोकांना आपण दाखवूच ! त्यांचा बंदोबस्त करू, असे वारंवार म्हटल्यामुळे ही मुले
अशा प्रकारची कामे करावयसा तयार होतात. तसेच ज्यांनी अशी कामे
उदाहरणार्थ स्फोट घडविणे, दंगे करणे, ठेचून
मारणे अशी कामे केलेली आहेत. ती माणसं त्यांना आपले ‘हिरो’ वाटतात. हे लोक किती मुजोर
झाले याचे अलिकडील चांगले उदाहरण म्हणून या घटनेकडे पाहता येईल. भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी स्वामी अग्निवेश यांच्यावर हल्ला चढविला.
आपण एका कफनीधारक विद्वानावर हल्ला करीत आहोत याचे त्यांना त्यावेळी अजिबात
भान नव्हते. स्वामी अग्निवेश हे वेळोवेळी जी सामाजिक ऐक्याची
भूमिका घेतात त्याबद्दल राग येऊन त्यांनी असे कृत्य केले. ज्याचा
देशभर निषेध झाला. https://saptahikyugantar.blogspot.com/
गुन्हेगारांच्या जर
अशा मिरवणुका निघणार असतील, गुन्हेगारांचे जर असे समर्थन होणार असेल तर
येणारा काळ हा देशासाठी कठीण काळ असणार आहे. कोणत्याही देशाचा
व्यवहार हा त्या देशाच्या राज्य घटनेतील तत्त्वानुसार चालावा अशी अपेक्षा असते.
कायद्यानुसार जो गुन्हेगार आहे त्याच्याकडे गुन्हेगार म्हणूनच पाहिले
जावे. म्हणजे अशा प्रकारचा गुन्हा करण्यासाठी इतर कोणी सहजपणे
धजावणार नाहीत. पण जर का गुन्हेगारांचे असे समर्थन होऊ लागले
तर गुन्हेगार निर्माण होण्याची प्रक्रिया गतिमान होईल आणि गुन्हेगारांची समाजातील संख्याही
वाढेल. असे झाल्याने ग्रामपंचायतीपासून ते संसदेपर्यंत सर्वच स्तरावरील यंत्रणेमध्ये चांगल्या
माणसांपेक्षा गुन्हेगारच मोठ्या संख्येने असतील. आजही सर्वत्र
काही प्रमाणात गुन्हेगार आढळतात; पण त्यांची संख्या तशी कमी आहे.
पुढे ती वाढण्याचा धोका संभवतो. विरोधक वारंवार
जे म्हणतात त्यामध्ये तथ्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांनी
स्वत: लक्ष घालून असे प्रकार देशात होणार नाहीत याची काळजी घेतली
पाहिजे. पण नरेंद्र मोदी यांना मात्र तसे अजिबात वाटत नाही.
आजवर त्यांनी अशा प्रकारांचा निषेधही केलेला नाही. त्यामुळेच तर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना अप्रत्यक्ष प्रोत्साहन मिळत
राहते.
2019 साली
लोकसभेसाठी सार्वत्रिक निवडणुका व्हायच्या आहेत. निवडणुका जशा
जवळ येतील तसे वातावरण तापत जाईल. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी
झडू लागतील. मतदारांना आपणाकडे आकर्षित करण्याचे मार्ग शोधले
जातील. जे आपणाकडे येणार नाहीत त्यांना धाकदपटशा दाखविला जाईल.
त्यातून हिंसा घडण्याची दाट शक्यता आहे. आणि म्हणूनच
सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपने आणि त्याचबरोबर इतर सर्व राजकीय पक्षांनी आपल्या कार्यकर्त्यांना
राज्यघटनेने घालून दिलेल्या कक्षेतच काम करण्याची शिस्त लावली पाहिजे.
- आनंद मेणसे