28 सप्टेंबर हा भगतसिंगाचा जन्मदिवस! त्याच्या जन्माला जवळजवळ
110 वर्षे झाली. तर त्याच्या व त्याच्या साथीदारांच्या हौतात्म्याला
87 वर्षे होऊन गेली. काळ पुढं गेला. त्याबरोबर पारतंत्र्य गेले. स्वातंत्र्य आले.
गोरे गेले, काळे आले. गोर्यांना भगतसिंग धोका होता, तेव्हा त्याला विस्मृतीच्या
खोल गर्तेत ढकलून देणे भाग होते. काळ्यानाही असेच वाटत होते.
स्वातंत्र्यातील भांडवली व्यवस्थेने, धर्मांध कारस्थान्यानी
व तथाकथित लोकशाहीवाद्यानी भगतसिंग जनतेच्या विस्मरणात जावा म्हणून भरपूर प्रयत्न केले.
परंतु कष्टकरी सामान्य जनता या डावाला बळी पडली नाही. महामानवांना, शहिदांना जनता विसरू शकत नाही. जोपर्यंत माणसाची माणसाकडून केली जाणारी लूट थांबणार नाही, भाकरीसाठीचा संघर्ष संपणार नाही; अंधश्रद्धा व धर्मांधतेला
आणि जातीवादाला मूठमाती दिली जाणार नाही, तोपर्यंत भगतसिंग क्रांतिकारक
व त्यांचा ‘‘इन्कलाब जिंदाबाद’’ चा नारा
अन्यायी व्यवस्थेबरोबर झुंज देत राहणार.
भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांच्या बलिदानानंतर जवळ जवळ अठरा वर्षांनी
आपला देश स्वतंत्र झाला. दिडशे वर्षाच्या गुलामगिरीच्या बेड्या
निखळल्या. जगाच्या पाठीवरचा एक खंडप्राय देश स्वतंत्र झाला.
त्यांनी आपल्याबरोबर शेजारच्या राष्ट्रांना स्वातंत्र्याची प्रेरणा दिली.
आमच्या स्वातंत्र्य संग्रामाचे वर्णन करताना मोठ्या अभिमानानं सांगितलं
जाऊ लागलं की, ‘‘आम्ही रक्ताचा थेंबही न सांडता स्वातंत्र्य मिळविले.
पुढं सांगितलं जाऊ लागलं,’’ की ‘‘आम्ही मनुस्मृती गाडली आणि संविधानाची
प्रस्थापना केली.’’ हे काम निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे.
पुढं दावा केला गेला की, ‘‘आम्ही जगाच्या पाठीवरची
महान लोकशाही बनलो. आमची लोकशाही संसदीय प्रणाली, धर्मनिरपेक्षता व सामाजिक न्यायाची कदर करणारी आहे.’’ भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत.
असे गौरवोद्गार काढताना आमच्या अंगावर रोमांच उभे राहू लागले.
अशी खूप शब्दबंबाळ वर्णन करून वास्तव दडविलं गेलं. त्यामुळेच अत्यंत व्यथित अंत:करणाचे एका कवीला म्हणावं
लागलं :
‘‘भगतसिंग इस बार
न लेना, काया भारत वासी की
देशभक्ती के लिये आज भी, सजा मिलेगी फासी की,
बंब-संब की मत पुछो, भाषण दिया तो पकडे जाओंगे।
न्याय अदालत की मत सोची
सिधी मुक्ती पाओंगे॥ ’’
महमंद इकबालच्या ‘‘सारे जहाँ से अच्छा हिंदुस्ता हमारा’’
या देशातील कवी असे, का म्हणतो? भगतसिंग आज प्रस्तुत नाही म्हणून तो असे म्हणतो
काय? का त्याचा विचार आज देश विघातक ठरला आहे? असे अनेक प्रश्न मनात येत असताना, ठामपणे निघालेला दुसरा
आवाज कानांवर पडतो, निदान काही जणाच्या मनात घर करून बसतो,
काय आहे, हा दुसरा आवाज :
‘‘भगतसिंग,
तूं जिंदा है।
हर एक लहू के कतरें मे’’
असे असतानाही आज काही जणांना
भगतसिंगाचा विचार कालबाह्य झालेला वाटतो. शहिदांच्या लढ्याला
आज काही अर्थ उरला नाही. ते आतंकवादी होते, आम्ही अहिंसावादी आहोत, त्यांचा ध्येयवाद म्हणजे एक स्वप्नरंजन
होते, आम्ही आज पारतंत्र्यात नाही, तर लोकशाहीच्या
खुल्या वातावरणात आहोत, आज कायद्याचं राज्य आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे एका बाजूचे म्हणतात,
‘‘भगतसिंगाच्या विचारांची आज गरज नाही. तर दुसर्या बाजूच्यांना वाटते, भगतसिंग आजही जिवंत आहे राहणार
आहे, नाही सर्वजण आज गद्दार झाले नाहीत, भगतसिंग डोक्यात घेऊन आज संघर्षाच्या मैदानात उभे आहेत. कारण त्यांनी स्वातंत्र्य आंदोलनाचा खरा विचार समजावून घेतला आहे. आज सत्तेवर बसलेले स्वातंत्र्य आंदोलनाचे खरे वारसदार नाहीत. म्हणूनच भगतसिंगाच्या वारसदारांचे आजही सांगणे आहे :
‘‘तुने तो जब ही
कहाँ था,
यह आजादी नही, धोका है
कोरी मुक्ती नही है यारों
गोरो के संग सौदा है। ’’
भगतसिंग विस्मरणात जावा, शहिदांच्या परंपरेचा इतिहास पुसला जावा, धर्मांधतेला
आणि साम्राज्यवाद्याना आव्हान दिलं जाऊ नये असे आजच्या सत्ताधार्यांना वाटते. असं वाटणार्या सत्ताधार्यांचे वारसदार, घराणेशाहीचे शिलेदार जनसामान्यांना चिरडू
पाहणार्या जुलमी सत्ता केंद्राला ताब्यात घेऊ पाहात आहेत.
त्यासाठी ते कष्टकरी, दलित, शोषितांची युवा पिढी जातीवादात, कर्मकांडात, व्यसनांत कावेबाजपणे सडवीत आहेत. https://saptahikyugantar.blogspot.com/
23 मार्च
1931 रोजी भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांचा जगण्याचा अधिकार, साम्राज्यवादाने बळाचा
वापर करून हिरावून घेतला. परंतु ते आपल्या ध्येयवादापासून तसूभरही
ढळले नाहीत; त्यांनी सत्तेला ललकारले, तिचा
धिक्कार केला, तिचं ढोंगी स्वरूप जगाच्या वेशीवर टांगले आणि युवा
पिढीला अजिंक्य प्रेरणा देणारा जणू मंत्र म्हटला :
‘‘सर देके के राहे
इटकने ऐसा मजै मिला
हसरत यह रह गई कि कोई और
सर नया’’
या शहिद वाणीचे पडसाद आपल्या
देशातील अनेक भाषांत उमटले. मराठी भाषेत कवी कुसुमाग्रजांनी ‘‘गर्जा जयजयकार क्रांतीचा’’या आपल्या तेजस्वी कवितेत शहिदांचा
आशावाद पुढीलप्रमाणे नोंदविला :
‘‘सरणावरती आज आमुची
जळतील ही प्रेते
त्या ज्वालेतून निघतील
आदी क्रांतीचे नेते’’
कसा सोडवायचा आजच्या स्वातंत्र्यातील
गुंता, दिवासागणीक गुंता वाढतो आहे. ज्यांना त्याचं भान यायला हवं, तो तरुण आज भलत्याच वाटेवर
भटकतो आहे.परिणामी पाहता पाहता, धर्मांध
शक्तींनी ‘‘भाकरीचा प्रश्न महत्त्वाचा’’ मानला त्या स्वामी विवेकानंदवर जो प्रयोग केला तोच आज ते भगतसिंगांवर करू पाहत
आहेत. शिवरायाचा, बाबासाहेबांचा मतलबी जयजयकार
करून एकाधिकारशाहीकडे वाटचाल करणार्यांना आज भगतसिंगच्या प्रेमाची
उबळ आली. ते सांगत आहेत की फासावर जाताना भगतसिंगांनी भगवद् गीतेचे
पठण केले. जसे ते शहिदांच्या हाती कावेबाजपणे भगवद्गीता ठेवत
आहेत, तेवढ्याच बेदरकारपणे ते नथूरामाला शहिद बनवू पाहत आहेत.
भगतसिंगाला अल्पसं आयुष्य
लाभलं. परंतु हे आयुष्य पिढ्यान् पिढ्यांच्या युवकांना
खंबीर साथ देणारं ठरलं. त्याच्या छोट्याशा आयुष्याला हे चिरंजीव
मोल कां लाभलं? कारण तो विज्ञानवादी होता, धर्मांधतेच्या विरोधात होता. जातीयतेला - अस्पृश्यतेला त्यांनी विरोध केला. सर्व विषमतेला व शोषणाला
त्यांनी नकार दिला. देव-दैववादाला त्यांनी
दूर सारलं. त्याचा हा नकार जसा दिखावू, बढाईखोर नव्हता, तसा तो भावविवशतेने काढलेला उद्गारही
नव्हता. त्यांनी नास्तीकतेचे मूल्य पूर्ण विचाराअंती,
चिंतन, मनन व चिकित्सा करून स्वीकारलेलं होतं.
म्हणून त्याचा क्रांतीचा प्रयत्न त्याच्यापूर्वीच्या क्रांतिकारकांपेक्षा
वेगळा होता. त्याला अपेक्षित असलेली क्रांती इंग्रजाला येथून
हाकलून देण्यापुरती नव्हती. https://saptahikyugantar.blogspot.com/
तिचे ध्येय समाजवादाची
प्रस्थापना करणे होते. खर्याखुर्या स्वातंत्र्याची, बंधूभावाची हमी देणारे होते.
म्हणूनच महात्मा गांधी सारख्या महान नेत्यांनी क्रांतिकारकांच्या विचारांची
व लढ्याची जी समीक्षा केली आहे, त्यात त्यांनी भगतसिंगाला सन्माननीय
अपवाद मानलं आहे. कारण तो मानवतेच्या शोधात निघाला होता.
म्हणूनच त्याच्या लढ्याच्या केंद्रस्थानी शेतकरी कामगार, दलित-शोषित व युवकांना महत्त्वपूर्ण स्थान होते.
त्याच्या लढ्याला-देशभराच्या कामगारांनी प्रचंड
प्रतिसाद दिला होता. त्यावेळी कामगारांच्या चळवळी दाबून टाकण्यासाठी
सरकार अन्यायी कायदा करू पाहत होते. कामगारांनी त्याला विरोध
केला; पण सरकार मात्र ताठर बनले होते, ते
बहिरे बनले होते. या सरकारला भानावर आणण्यासाठी भगतसिंगाला मोठा आवाज काढावा लागला,
धमाका उडवावा लागला. आजही असा आवाज काढण्याची गरज
आहे. जनसामान्याना अंध:कार नष्ट करण्यासाठी
हातात मशाल घेऊन उभे करण्याची गरज आहे. जनता तेंव्हाच उठेल की
जेव्हा जुनाट विचारांची झाडाझडती होईल. भगतसिंगाने म्हटल्याप्रमाणे
आजची युवापिढी आपल्या विचाराच्या तलवारीला तेज धार काढील; तेव्हाच
इन्कलाब जिंदाबादच्या जयघोषाला अर्थ प्राप्त होईल.
- प्रा. तानाजी ठोंबरे