कोरोना या विषाणूने जगातील 153 देशांत शिरकाव केला आहे. या विषाणूची लागण झाल्यामुळे 5 हजारांवर लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सुरूवात झाली
ती चीनमधून. चीनमधील हुआन प्रांतात हे
विषाणू सर्वप्रथम आढळले आणि चीनमध्ये भीतीचे वातावरण पसरले. जगातील एका बलाढ्य देशाला
एका विषाणूने हैराण करून सोडले. चीननेही हे आव्हान स्वीकारत आपल्या पद्धतीने
मोर्चेबांधणी करण्यास सुरूवात केली. हुआन
प्रांतास उर्वरीत चीनपासून पूर्णपणे वेगळे केले आणि सार्या प्रांताचेच रूपांतर एका
मोठ्या इस्पितळात व्हावे तसे त्यांनी केले. चीनमधील व्यवस्था असे करू शकते. तेथील जनता अशावेळी
शासनाच्या पाठीशी उभी राहते. चीनने आपल्या पद्धतीने या विषाणूशी मुकाबला करत
आपल्या देशातील जनजीवन पूर्वपदावर आणण्यात यश मिळविले आहे. आता प्रश्न आहे तो
आमचा. भारताचा.
आपल्या देशातील
महाराष्ट्र, केरळ
या दोन राज्यातून या विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. त्यानंतर बाकीची
राज्ये येतात. केरळ आणि महाराष्ट्रातच हा फैलाव होण्याचे कारण की विदेशातून या
राज्यात आलेल्यांची संख्या मोठी आहे. दिसते असे की हा विषाणू विदेशातून भारतात
आलेल्या प्रवाशांमार्फत आला. याचा असाही अर्थ होतो की, समाजातील श्रीमंतवर्गात याचा फैलाव प्रथम झाला आहे. कारण ही
माणसे कामानिमित्त, सहलीसाठी विदेशात गेली होती. चीनच्या खालोखाल या विषाणूचा फैलाव इटलीमध्ये
झाला. इटली हे लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. इटलीमधून मायदेशी येणारे प्रवासी हा
विषाणू घेऊन आले. भारताबाबतही असेच घडले आहे.
कोरोना विषाणूमुळे
होणारा ‘कोविद-19’ हा आजार वरिष्ठ मध्यमवर्गीय व श्रीमंत स्तरातील माणसांपुरता
सिमीत आहे. खरा धोका केव्हा निर्माण होईल जेव्हा या आजाराचा फैलाव सामान्य माणसात
होईल. भारतात तर अशा माणसांची संख्या मोठी आहे आणि या आजाराचा फैलाव रोखण्यासाठी
जी यंत्रणा उभी करणे आवश्यक होते ती यंत्रणा उभी करण्यात आणि याबाबतचे प्रबोधन
करण्यात आपण किती सक्षम आहोत हा खरा प्रश्न आहे. असे का म्हणावेसे वाटते याची काही
उदाहरणे देता येतील. कोरोना विषाणूची चर्चा सुरू असतानाच रंगपंचमीचा सण आला.
रंगपंचमीच्या सणात मोठ्या संख्येने लोक एकत्र येतात. एकमेकांवर रंगांची उधळण
करतात. यामध्ये सुके आणि ओले रंग वापरले जातात. अशा ठिकाणी विषाणूचा फैलाव
होण्याचा धोका असतो. खरे तर प्रशासनाने पुढाकार घेऊन यावर्षी या सणावर कायदेशीर
निर्बंध घालणे आवश्यक होते. पंतप्रधान महोदयांनी आपण रंगपंचमीचा सण साजरा करणार
नाही असे म्हणत एक संदेश देण्याचा प्रयत्न केला. पण तो वरिष्ठ पातळीवरच सिमीत
राहिला. गावपातळीवर मात्र त्याचे पालन झाले नाही. भारतीय समाज हा उत्सवप्रिय असल्याने केवळ प्रबोधनाने हे काम भागणार नाही.
प्रबोधनाच्या जोडीला प्रशासनाची साथ हवी. आवश्यकता वाटलीच तर कायद्याचा बडगा
उगारला जाणे आवश्यक.
रंगपंचमीच्या
सणापाठोपाठ येतो गुढी पाडवा. हा सणही मोठ्या उत्साहात साजरा करण्याची प्रथा आहे.
आता तरी कोरोना विषाणूंची तीव्रता ध्यानात घेऊन गुढी पाडव्याचा सण घरगुती स्वरूपात
साजरा होईल व सार्वजनिकरित्या होणार नाही
याची काळजी घेतली जाणे आवश्यक आहे. येथे प्रशासनाचा कस लागणार आहे. व्यापक
जनहित ध्यानात घेऊन प्रशासनाने काही
गोष्टी राबविणे आवश्यक आहे. गुढी पाडव्याच्यानंतर सुरू होतात ग्रामीण भागातील
यात्रा. यात्रांच्या निमित्ताने कुस्तीचे फड भरतात. मनोरंजनाचे कार्यक्रम होतात.
घरी पैपाहुणे येतात. यात्रेनिमित्त सभोवतालच्या गावातील लोक एकत्र येतात. यांना
आता रोखायचे कसे? कारण हीच ठिकाणे आहेत. जेथून कोरोना विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होऊ
शकतो. येथे जबाबदारी आहे ती जिल्हाधिकार्यांची. जिल्हाधिकार्यांनी सर्व
तालुक्यांच्या तहसीलदारांना बोलावून घेऊन त्यांच्या तालुक्यात होणार्या यात्रांची
माहिती मिळविली पाहिजे व त्यांच्यामार्फत त्या त्या गावातील पंचायतीच्या सभासदांना, यात्रा आयोजित करणार्या समितीला, गावातील पंच मंडळींना समजून सांगून यात्रा यावर्षीपुरती
स्थगित करा असा आग्रह धरला पाहिजे. जे कोणी ऐकणारच नाहीत त्यांच्यावर कायद्याचा
बडगा उगारायला प्रशासनाने मागे पुढे पाहू नये. तरच या यात्रा थांबतील आणि धोका
टळेल. यात्रा एका वर्षासाठी थांबली म्हणून देव काही नाराज होणार नाही. पण धोका
पत्करून यात्रा केल्यास देव नाराज होईल असे या लोकांना समजून सांगण्याची नितांत
गरज आहे.
कोरोना विषाणूचा
धोका आहे तो मोठ्या शहरांना. जेथे कामावर जाण्यासाठी माणसांना एसटी बस, लोकल रेल्वे यांच्यावर अवलंबून राहावे लागते. मुंबईतील लोकल
रेल्वे ज्या पद्धतीने धावते ते ध्यानात घेता असे म्हणावेसे वाटते की मुंबईत जर या
विषाणूचा शिरकाव झाला तर अवघ्या काही दिवसातच हा विषाणू मुंबईभर पसरेल. शाळा, महाविद्यालयांना शासनाने सुटी जाहीर केली आहे. आयटी
कंपन्यांनी आपली कार्यालये बंद ठेवून कर्मचार्यांना घरातून काम करण्यास परवानगी
दिली आहे. हे आयटीसाठी शक्य आहे. इतरांचे काय? दोन वेळेच्या भाकरीसाठी राबणारा जो मुंबईकर आहे त्याला घरी
बसून कसे चालेल. त्याला कामावर जावेच लागणार. आता अशा माणसांसाठी आपण कोणते नियोजन
केले आहे?
नियोजन करण्याची क्षमता आपणाकडे
निश्चितपणे आहे. पण त्यासाठी जी एक राजकीय इच्छाशक्ती लागते तिचा अभाव आपणाकडे
जाणवतो. यात्रा स्थगित केल्यावर आपले मतदार नाराज होतील काय? असा विचार करणारे अनेकजण आहेत. यांच्याकडून खंबीर निर्णयाची
अपेक्षा कशी करायची.
रुग्णाची तपासणी
करण्यासाठी जी यंत्रणा आवश्यक आहे तिचा अभाव आहे. एव्हाना प्रत्येक तालुक्याच्या
ठिकाणी एक तपासणी केंद्र उभे करण्याची गरज असताना आपण जिल्ह्याच्या ठिकाणी एक
केंद्र उभे करू शकलेलो नाही. आपली प्राथमिक आरोग्य केंद्रे इतकी अशक्त आहेत की
त्यांच्याकडून कोरोना विषाणूचा मुकाबला होईल अशी अपेक्षा व्यक्त करणेच कठीण.
आरोग्य विभागावर होणारा खर्च सरकारने कमी करून आरोग्य व्यवस्थेचे खासगीकरण
करण्यावर भर दिल्यामुळे हे असे घडले आहे. किमान आतातरी आपल्या सरकारने आपले
आरोग्यविषयक धोरण बदलावयास हवे आणि ते लोकाभिमुख कसे होईल हे पाहावयास हवे.
कोरोना विषाणूचा
फैलाव ध्यानात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली आहे. काही उपायही
सुचविले आहेत. अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाने आपल्या देशात आरोग्य आणीबाणी जाहीर
केली आहे. स्वत: राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी आपल्या कुटुंबियाची तपासणी
करून घेतली. स्पेनच्या पंतप्रधानांनी आपली तपासणी करून घेतली. स्पेनच्या
पंतप्रधानांच्या पत्नी कोरोनाग्रस्त असल्याचे आता जाहीर झाले आहे. याचा अर्थ असा
की अमेरिका, स्पेन, इटली, फ्रान्स, इंग्लंड या देशांनी कोरोना विषाणूकडे आवश्यक त्या
गांभीर्याने पाहिले आहे. दुर्दैवाने हे गांभीर्य आपणाजवळ अभावानेच आढळते आणि हीच
तर खरी चिंतेची बाब आहे.
येणारा काळ कसोटीचा
आहे,
आणीबाणीचा आहे. प्राप्त परिस्थितीत सर्व जबाबदारी शासनावर
सोपवून आपण गप्प बसून चालणार नाही. प्रत्येकाने या संकटाला सामोरे जाण्यासाठी
प्रयत्न करावयास हवेत. जेथे प्रबोधनाची गरज आहे तेथे प्रबोधन करावे. जेथे
प्रत्यक्ष मदतीची गरज आहे तेथे जाऊन मदत करावी. ज्यांना प्रत्यक्ष काम करणे कठीण
भासते;
त्यांनी आपल्या कुवतीनुसार अर्थसहाय्य करावे. अशा अनेक
गोष्टी वैयक्तिक पातळीवर तसेच सामाजिक पातळीवर केल्या जाऊ शकतात.
इतिहास असे सांगतो
की जेव्हा जेव्हा असे विषाणू समाजात थैमान घालतात तेव्हा तेव्हा त्याचा बळी हा
समाजातील दुर्बल घटक ठरला आहे. बकाल झोपडपट्टीत राहणारे आदिवासी, भटके असे जे समाज आहेत ते अशा आजारांना बळी पडण्याचा धोका
आहे आणि म्हणून हा विषाणू या समाजापर्यंत पोहोचणार नाही याची काळजी घेतली जाणे
अत्यंत आवश्यक आहे. आजार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा आजार होणारच नाही याची काळजी कशी घेता येईल हा
खरा प्रश्न आहे. आपल्या बाजूने जमेची बाजू अशी आहे की, मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी, डॉक्टर्स, आशा वर्कर्स, सामाजिक कार्यकर्ते, आरोग्य क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते या सर्वांना बरोबर
घेऊन शासनाने काही ठोस योजना आखण्याची आज नितांत गरज आहे. आजचे वातावरण पाहता
लोकांनी या आजाराची धास्ती घेतली आहे. लोक घाबरलेले आहेत. अशा घाबरलेल्या जनतेला
दिलासा देण्याचे काम आधी व्हायला हवे. कोरोना विषाणूशी दोन हात करण्याची शक्ती
आपल्या देशाकडे आहे मात्र तिचा उपयोग व्हावयास हवा.
- प्राचार्य डॉ. आनंद मेणसे