कामगार दिन जसा जवळ येऊ लागतो तसं मन स्वभाविकपणे स्मरणरंजनाच्या
गल्लीबोळात, मैदानातील सभांच्या, कार्यक्रमांच्या आठवणीत रमून जाते. स्मरणरंजन,
इंग्रजीत त्याला ‘नॉस्टालजीया’ असे म्हणतात. आपल्या एका मान्यवर लेखकानी स्मरणरंजन किंवा नॉस्टालजीया हा एक आजार असल्याचीच
गमतीने टिप्पणी केलीय व त्यावर उपचार करून घेण्याचा सल्ला दिलाय. अर्थात, हा काही वादाचा मुद्दा आपल्यासाठी नाही.
कायम इतिहासात रमणं नक्कीच स्वागतार्ह नाही. खरा
इतिहास समजून घेत त्याचा भविष्यात फायदा झाला तर स्मरणरंजनाची ‘Risk’ घ्यायला हरकत नसावी. जगभरातील अनेक देशात मे दिनाची म्हणजे कामगार दिनाची सुट्टी असते. युरोप, अमेरिका, आफ्रिका,
आशिया आदी खंडांतील बहुतेक देशांना 1 मे हा आंतरराष्ट्रीय
कामगार दिवस म्हणून सुट्टी असते. अगदी आजही हा दिवस साजरा होतो.
आपल्या देशात, काही प्रांतांत हा दिवस साजरा होतो
पण ‘गॅझेटेड’ सुट्टी नसते. त्यातही उत्तर भारतात हा दिवस तसा दखलपात्र नसतो. या
दिवसाची सुरुवात त्यावेळच्या मद्रासमध्ये झाली. कामगार कष्टकर्यांचे प्राबल्य असलेल्या तेलंगणा, ओडिसा, प. बंगाल, बिहार, आंध्र इत्यादी राज्यांत ‘कामगार दिन’ साजरा होतो.
तरीसुद्धा जुन्या वयस्कर मंडळींसाठी प्राप्त परिस्थितीत
कामगार दिनाचे स्मरणरंजन स्वाभाविक असेच आहे.
आणि का नसावं? महाराष्ट्राला म्हणजे तत्कालीन मुंबई
राज्याला कामगार दिनाची सुट्टी नव्हतीच. पण मुंबईच्या कामगारांनी,
खासकरून गिरणी कामगारांनी, तेव्हाच्या मध्यमवर्गानी
अक्षरश: लाठ्या खाऊन, गोळ्या झेलून,
105 बळी देऊन इतिहास घडविला, तो असा की कामगार
वर्गाच्या राजकारणाचा तिरस्कार, द्वेष, मत्सर करणार्या कुणाचीही आता
सुटका नाही. ‘कामगार दिना’साठी महाराष्ट्र दिन म्हणून सुट्टी द्यावीच लागणार. हाच तर कामगार वर्गीय लढ्याचा दणका
आहे, मग्रुर भांडवलशाहीला दाखवलेला हिसका आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेची नाळच आंतरराष्ट्रीय कामगार दिनाशी जोडली गेली.
त्यामुळे कुणाला पटो न पटो, आवडो न आवडो,
कामगार दिनाच्या दिवशीच अधिकृत सुट्टी, महाराष्ट्र
दिनाची.
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मुंबईभर
‘‘मुंबई तुमची,
भांडी घासा आमची’’ ही घोषणा कुत्सित स्वरूपात दुमदुमत
होती. काही विधुळवाट्या शक्तींनी ह्या घोषणेस जातीय-भाषिक रंग देऊन ह्याला कोतं स्वरूप दिलं होतं. वास्तविक
ह्या घोषणेला नक्कीच इतका कोता, आखूड बाज नव्हता. ही कुठली जातीय, भाषिक स्वरूपाची मर्यादित घोषणा नव्हती.
ह्या घोषणेमागे भांडवलशाहीची मग्रुरी ठाम उभी होती. कामगारवर्गाला सतत दडपणारी, कामगार वर्गाला दाबून ठेवणारी,
उर्मी होती. कायम ओशाळं ठेवणारी प्रवृत्ती होती.
ही प्रवृत्ती वैश्विक
होती, आहे. फक्त एतद्देशीय नव्हती.
म्हणूनच तर महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर जेमतेम सहा वर्षांनंतर मराठी
अस्मितेचा बागुलबुवा उभा राहिला. पण अंतस्थ हेतू दुसराच होता.
वैश्विक षड्यंत्राचा
तो एक भाग होता.
त्यानंतरचा इतिहास बहुतेकांना ज्ञात आहे. प्रश्न स्मरण गल्लीत जाण्याचा का यावा? तरीसुद्धा स्मरणरंजन
प्रेरणादायी, स्फूर्तिदायी नक्कीच होतं. उदाहरणार्थ 60 वर्षांपूर्वी तत्कालीन जनसंघाचे कार्यकर्ते
‘इधर देखो दीपक!
उधर देखो दीपक! अबकी बारी, अटल बिहारी!’ घोषणा देऊन थकून जात. त्यांचं स्मरणरंजन आता कसं होत असेल? प्रेरणादायक? उन्मादी का स्मरणरंजनाची गरज नसावी? नसावी बहुतेक,
कारण आता तर वातावरण उन्मादीच दिसतंय त्यांच्याकडून आणि उन्मादात स्मरणरंजन
कुठले? स्मरणरंजनाला हळुवारपणाची, थोडी
खिन्नतेची झांक असते. जोश, उन्माद,
जोम तिथे कामाचा नसतो.
थोडक्यात,
पुलाखालून किंवा हजारो पुलांखालून चिक्कार पाणी वाहून गेलंय.
महाप्रचंड उलथापालथ झालीय. चाळी गेल्या,
ब्लॉक्स आले नी गेले सुद्धा न् टॉवर उभे राहिले. मॉल्स, मल्टीप्लेक्स, फलायओव्हर,
कॉफी शॉप्स, पीझ्झाहट, बर्गर्स,
पब्ज, चंगळवादी वस्तुंची शेकड्यांनी रेलचेल,
फलॅट्स, रो हाऊसेस, फार्म
हौसेस, पर्यटन देशी परदेशी, शनिवार रविवार
चुल (!) बंद,
दुनिया मुठ्ठीमें, लागली समाधी ब्रह्मानंदी टाळी.
तरी सुद्धा काहींना स्मरणरंजन विसरता येत नाही आणि प्रश्न पुन्हा पडतोच.
जागतिक मंदी सावरायला कुठले हात सरसावतात? कुणाचे हात मंदी थोपवतात?
कशामुळे जगण्याची हीच पद्धत ठरवतात! शेवटी आजही
ह्या आर्थिक धोरणांमुळे भांडी घासावीच लागताहेत. कॉर्पोरेट्स
चलाखीने त्यांची कामे करताहेत पण कॉर्पोरेट ‘सेवकांच्या’ घमेंडीमुळे त्याची स्पष्ट जाणीव नाही.
म्हणूनच येणार्या
मे दिनाचे परिप्रेक्ष हवे 2019चे आणि आताच ‘अजेंडा’ थेट राबवायला हवा. एकाक्ष जागतिकीकरणाचे तोटे, पोकळ फायदे, विकासाच्या नावे भकास, शेतकरी खल्लास या गोष्टी करलपणे
कानाकोपर्यात घुसवायला हव्यात,
लोकांच्या डोक्यात फिट्टपणे बसायला हव्यात. मे
दिनाला ह्या अजेंड्याचा एल्गार व्हायला हवा. म्हणजे
2019चा मे दिन हा आताच्या सत्ताधार्यांसाठी स्मरणरंजन ठरावा कायमचाच.