जनविरोधी जनसुरक्षा कायदा रद्द करावा, या मागणीसाठी राज्यभरात सुरू असलेल्या जनआंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून १४ ऑगस्ट रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राज्यव्यापी परिषद आयोजित करण्यात आली आहे. ही परिषद जनसुरक्षा कायदा विरोधी संघर्ष समितीच्या वतीने आयोजित करण्यात येत असून, राज्यातील डावे, प्रागतिक पक्ष आणि जनसंघटना यामध्ये सहभागी होणार आहेत.
या परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरदचंद्र पवार हे मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन परिषदेसाठी आमंत्रण दिले असता, त्यांनी ते स्विकारले असून उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले आहे.
या शिष्टमंडळात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव ॲड. कॉ. सुभाष लांडे, राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ. प्रकाश रेड्डी, मुंबई शहर सेक्रेटरी कॉ. मिलिंद रानडे, भारत जोडो अभियानाच्या उल्का महाजन, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ. शैलेंद्र कांबळे, भाकप (माले लिबरेशन) चे कॉ. उदय भट, कॉ. विजय कुलकर्णी आदींचा समावेश होता.
परिषदेत भाकप, माकप, शेकाप, भाकप (माले लिबरेशन), सकप, समाजवादी पक्ष, भारत जोडो अभियान, श्रमिक मुक्ती दल, विविध प्रागतिक संघटना व चळवळी एकत्र येऊन जनसुरक्षा कायद्याविरोधात राज्यव्यापी लढ्याचे पुढील दिशा-निर्देश निश्चित करणार आहेत.