पत्रकार व फोटोग्राफर्सना दरमहा 10 हजार निर्वाहभत्ता द्या : भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मागणी

अहमदनगर : आम्ही आपल्या आजुबाजूला पहातोय, आपले छायाचित्रकार दोस्त अडचणीत आहेत. मुळात या धंद्यात नफ्याचे प्रमाण फार कमी आहे. हा हौशी माणसांचा धंदा आहे. त्यात सर्वच मोबाईलमधे कॅमेरे आल्याने स्टुड्युओत जाणारांचे प्रमाण कमी झालेले आहे. जे काही आहे ते फक्त स्किल्ड फोटोग्राफरकडेच आहे. महागडे कॅमेरे, स्टुड्युओचे भाडे, अॅक्सेसरीज यासाठी केलेली मोठी गुंतवणुकहि अडचणीत आलेली आहे. 

कोरोना आणि सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे निर्माण झालेल्या देशातील आर्थिक मंदीच्या गंभीर काळात सर्वसामान्य माणसांची फोटो काढुन घेण्याची मानसिकता नाही. त्यांच्याच धंद्यारोजगाराची शाश्वती नसल्याने माणसे प्रचंड अडचणीत आहेत. सार्वजनिक कार्यक्रम रद्द झाल्याने फिल्ड फोटोग्राफर बंधुंना धंदा नाहीच. लग्नकार्य, वाढदिवस, सार्वजनिक मनोरंजन कार्यक्रम, राजकिय कार्यक्रम नाहीच. 

त्यामुळे फोटोग्राफर बंधुंना अडचणीत सोबत उभे राहण्यासाठी आम्ही भारतीय कम्युनिस्ट पक्षाने राज्य व केंद्र सरकारला आजच्या १९ मे २०२० च्या राष्ट्रव्यापी निदर्शनामधे सर्व फोटोग्राफर बंधु भगिनींना १० हजार रूपये मासिक निर्वाहभत्ता द्या!, हि प्रमुख मागणी केलेली आहे.

त्याचप्रमाणे वर्तमानपत्र उद्योग आज मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेला आहे. ग्रामिण व शहरी भागात तरूण पिढी मोठ्या प्रमाणात या फिल्डमधे उतरलेली आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे हा उद्योगही अडचणीत आल्याने पत्रकारांचे वेतन कापले गेलेले आहेत तसेच काहीच्या नोक-या गेलेल्या आहेत. 

जे इतके दिवस समाजासाठी भांडत होते त्यांचे प्रश्न सोडवत होते. तेही आज सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे अडचणीत आलेले आहेत. पत्रकार बांधवांनाही १० हजार रूपये मासिक निर्वाहभत्ता द्या, हि मागणी आम्ही केंद्र व राज्य सरकारकडे करत आहोत, असे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी कॉम्रेड भैरवनाथ वाकळे यांनी पक्षाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post