गरजू लोकांना मदत आणि त्यांच्या हक्कांसाठी संघर्ष हेच लेनिन यांना अभिवादन : कॉ. डी. राजा

लेनिनच्या 150 व्या जयंतीनिमित्त कॉ. डी. राजा यांचे भारतीय कम्युनिस्ट पक्ष कार्यकर्त्यांना पत्र..

कॉम्रेड व्ही. आय. लेनिन यांना लाल सलाम आणि सर्व कार्यकर्त्यांना क्रांतिकारी अभिवादन...

प्रिय कॉम्रेडस, 
22 एप्रिल 2020.. कॉम्रेड ब्लादिमिर इलीच लेनिन यांची 150 वी जयंती... कार्ल मार्क्सनंतरचे एक महत्वाचे सैद्धांतिककार आणि विचारवंत म्हणून कॉ. व्ही. आय. लेनिन यांना ओळखले जाते. ते एक महान रणनितीकर होते. त्यांनी 1917 साली साम्यवादी (कम्युनिस्ट) क्रांतीचे नेतृत्व केले होते, जी महान ऑक्टोबर क्रांती म्हणून जगभर साजरी केली जाते. यातूनच सोव्हिएत संघाची निर्मिती झाली, जो जगातील पहिला कामगार वर्गीय राज्यव्यवस्था असणारा देश बनला..  जगातील पहिले कम्युनिस्ट सरकार; सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतरही लेनिनचे महान कार्य केवळ रशियातील जनतेसाठीच नव्हे तर जगातील सर्वच लोकचळवळींसाठी एक प्रेरणादायी स्रोत राहिले आहे. 

मार्क्सनंतर द्वंद्वात्मक आणि ऐतिहासिक भौतिकवाद, राजकीय अर्थशास्त्र आणि वैज्ञानिक समाजवाद या सिद्धांतांचा विकास करत लेनिनने त्यात महत्वाची भर घातली. लेनिनने भांडवलशाही विकासाच्या नव्या टप्प्याची विस्तृत व्याख्या केली. त्यांनी आपल्या 'साम्राज्यवाद : भांडवलशाहीची सर्वोच्च अवस्था' या ग्रंथात भांडवलशाहीच्या परावलंबी आणि मरणासन्न चरित्राची व्याख्या केली आहे आणि भांडवलशाहीकडून समाजवादाकडे कशी वाटचाल होऊ शकेल, याबाबत विवेचन केले आहे. 

प्रारंभी आणि जागतिक महामंदीच्या काळात लेनिनच्या साम्राज्यवादाबद्दलच्या व्याख्येने सर्व प्रकारच्या शोषण आणि भेदभावापासून मुक्त कामगार वर्गाच्या नेतृत्वाखालील पर्यायी राज्यव्यवस्थेची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्याचा मार्ग दाखवून दिला.

लेनिन हे कामगार वर्गाच्या बोल्शेविक पार्टी या पक्षाचे संस्थापकही होते, जो पक्ष नंतर सोव्हिएत युनियनमधील कम्युनिस्ट पक्ष बनला. लेनिन यांना 'What is to be done' या ग्रंथातून पार्टी बनविण्यास मदत झाली. 

लेनिन यांनी एक प्रभावी कम्युनिस्ट नेता बनताना आंतरराष्ट्रीय स्तरावर एकजुटता मजबूत करण्यामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावली. तिसऱ्या कम्युनिस्ट इंटरनॅशनलच्या स्थापनेतही त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.

कोरोना साथीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जगभर अनेक देशात लॉकडाऊन आहे. भारतातही लॉकडाऊनची स्थिती आहे, ज्यामुळे सार्वजनिक स्तरावर लेनिन यांची 150 वी जयंती करणे शक्य नाही. तरीही कम्युनिस्ट कार्यकर्ता म्हणून आपल्याला गरीब, स्थलांतरित कामगार आणि समाजात भेदभावाचे बळी ठरलेल्या लोकांच्या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

कम्युनिस्ट कार्यकर्त्यांनी संकटांचा सामना करणाऱ्या जनतेसोबत स्वतःला जोडून घेऊन आपली सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे. 

आज आपण कामगार वर्गाच्या सर्वोच्च नेत्याला अभिवादन करत आहोत, अशावेळी भारतीय कम्युनिस्ट या नात्याने आपल्याला स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन समाजवादाच्या स्थापनेसाठी कार्यरत राहिले पाहिजे. संकटांचा सामना करणाऱ्या लोकांपर्यंत पोहचणे, त्यांना मदत करणे आणि राज्य व केंद्र सरकारवर योग्य निर्णय घेण्यासाठी दबावगट तयार करण्यामध्ये आपण महत्वाची भूमिका बजावावी. 

लोकांना या संकटसमयीसुद्धा एक चांगले जीवन जगायला मिळणे, हा त्यांचा अधिकार आहे. राज्य आणि केंद्र सरकारने हे लक्षात ठेवले पाहिजे, की ते अशा लोकांसाठी काम करत आहेत की जे देशात साधनसंपत्तीची निर्मिती करणारे आहेत. या नागरिकांवर आपण दया करतोय, असा अविर्भाव सरकारने ठेवू नये. 

मी सर्व पक्ष कार्यकर्त्यांना आवाहन करतो, की गरजू लोकांच्या मदतीसाठी स्वतःला झोकून द्या. हेच खरे लेनिन यांना अभिवादन ठरेल.

आपला कॉम्रेड
- डी. राजा
महासचिव, भारतीय कम्युनिस्ट पक्ष

(मराठी अनुवाद : सुशील लाड)

Post a Comment

Previous Post Next Post