मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील महाविद्यालये व विद्यापीठे मार्च महिन्यापासून सरसकट बंद आहेत. राज्यातील पदवी व पदव्युत्तर विभागाच्या परीक्षांविषयी विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. एक जबाबदार विद्यार्थी संघटना म्हणून परीक्षा कदापि रद्द करू नयेत. त्या काही कालावधीनंतर जरूर घ्याव्यात. पण ग्रामीण व निमशहरी विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेऊन ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेणे टाळावे, अशी मागणी ऑल इंडिया स्टुडंटस् फेडरेशन (AISF) या विद्यार्थी संघटनेच्या महाराष्ट्र राज्य कौन्सिलने केली आहे. याबाबतचे निवेदन संघटनेच्यावतीने राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांना पाठविण्यात आले आहे.या निवेदनात म्हटले आहे, की सोशल डिस्टन्सिंगची काटेकोर अंमलबजावणी करत सर्व पदवी, पदव्युत्तर परीक्षा घेण्यात याव्यात. सदर परीक्षांविषयी विद्यार्थ्यांना किमान २ आठवड्यांपूर्वी कल्पना देण्यात यावी. कोरोना प्रादुर्भावामुळे शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या झालेल्या गैरसोयीमुळे सदर शैक्षणिक सत्रात/वर्षात सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात यावे. उत्तीर्ण होण्यास गुणांची कमतरता भासत असल्यास प्रमोट करण्यात यावे. तसेच विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करावे. शुल्क जमा केले असल्यास ते तात्काळ परत करण्यात यावेत, अशा मागण्याही या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
निवेदनावर AISF चे राज्याध्यक्ष विराज देवांग, राज्यसचिव प्रशांत आंबी, सहसचिव अंजली आव्हाड, सुजित चंदनशिवे, उपाध्यक्ष हिमांशू अतकरे, अफरोज मुल्ला, कोषाध्यक्ष प्रितेश धारगावे यांच्या सह्या आहेत.