देवभूमीत अयप्पा देव कोपला?


गेल्या सुमारे 100 वर्षानंतर तुफानी पावसाने केरळचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. 8 ऑगस्टपासून सतत 15 दिवस थैमान घातलेल्या पावसाने हजारो कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. सुमारे 7 ते 8 लाख स्त्री-पुरुषांना सरकारने उभारलेल्या 3500 मदत केंद्रांमध्ये हलवण्यात आले आहे. 400 पेक्षा जास्त माणसे आतापर्यंत दगावली आहेत. राज्यातील 14 पैकी 11 जिल्ह्यांना या महाभयानक अशा नैसर्गिक आपत्तीने वेढले असून एर्नाकुलम, इडुकी, त्रिशूर, अलापुझा आदी 5 जिल्ह्यांतील परिस्थिती जास्त गंभीर आहे. ही राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करण्याचे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केंद्र सरकारला केले आहे.

केरळ पुन्हा पूर्वपदावर येण्यासाठी केरळमधील डाव्या आघाडीचे सरकार, मंत्री, आमदार, कम्युनिस्ट पक्षाचे नेते, कार्यकर्ते प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असून नेव्ही, आर्मीच्या जवानानी युद्धपातळीवर मदतकार्य सुरू केलेले आहे. भा... नेते टी. एस. चंद्रन यांचे मदत कार्य करताना कॅनालमध्ये पडून निधन झाले. स्वयंसेवी संस्था सामाजिक व राजकीय कार्यकर्ते, परदेशी संस्था व सरकारेही मदतीसाठी सरसावली असताना केंद्र सरकारने मात्र हात आखडता घेतला आहे. गृहमंत्री राजनाथसिंह यांनी केवळ 100 कोटींची देऊ केलेली मदत म्हणजे चेष्टा असल्याच्या प्रतिक्रिया आल्यानंतर पंतप्रधानांनी 500 कोटी रुपयांची मदत घोषित केली आहे. ही मदतही अत्यंत अपुरी असून कोणतेही राजकारण न करता केरळ राज्याची घडी पूर्वपदावर येण्यासाठी सरकारने पुरेशी मदत करण्याचे आवाहनही भाकपने केले आहे. युनायटेड अरब इमारेटसने 700 कोटी रुपयांची मदत घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने या गंभीर राष्ट्रीय आपत्तीची कितीगंभीरपणेदखल घेतली आहे हे दिसतेय. ओखी वादळ व निपाह रोग या नैसर्गिक आपत्तींचा सामना केल्यानंतर वर्षभरातील तिसर्या मोठ्या आपत्तीचा केरळच्या जनतेला सामना करावा लागत आहे.https://saptahikyugantar.blogspot.com/ 

एकीकडे डाव्या आघाडीच्या सरकारमधील मंत्री या पद्धतीने सर्वस्वी झोकून देऊन प्रत्यक्ष मदत कार्य सुरू केलेले असताना व देशभरातून पूरग्रस्तांसाठी मदत निधी जमा होत असताना धर्मांधांचा बालिशपणा अखंडपणे सुरू आहे.

केरळमधील साबरीमाला मंदिरात स्त्रियांसाठी असलेली प्रवेशबंदी सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच उठवल्यामुळे ही पूरस्थिती उद्भवल्याचे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधीत मंडळी करू लगाली आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक म्हणून नुकतेच नियुक्त झालेले स्वामीनाथन गुरूमूर्ति यांनी तर सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालाचा फेरविचार करण्याचे सूचवले आहे. अतिउच्च शिक्षण घेतलेल्यांचा व बुद्धीमत्तेचा अर्थाअर्थी संबंध नाही हे यावरून स्पष्ट होतेय. हे स्वामीनाथन गुरूमूर्ति म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर स्वयंसेवक. स्वदेशी जागरण मंचचे पदाधिकारी राहिलेले व पंतप्रधान मोदींचे विश्वासू! 500 ते 1000च्या नोटा बंद करण्याचा सल्ला याच महाशयानी मोदींना दिल्याचे पत्रकार प्रांजो गुहा ठाकूर्ता यांनी पूर्वी म्हटले होते. ‘‘No law is above God... if you permit everyone, he denies everyone.’’ अशी प्रतिक्रिया समाजमाध्यमावर एकाने दिल्यानंतर या आर.बी.आय.च्या डायरेक्टर महोदयांनी ‘‘Supreme Court judges may like to see if there is any connection between the case and what is happening in Sabrimala...’’ असे ट्विट करून आपली अक्कल पाजळली. गुरुमूर्तिवर काहीजणांनी टीका केल्यानंतरही मी जरी आर.बी.आय.चा डायरेक्टर झालो असलो तरी माझ्या मतावर मी ठाम असल्याचे व पद माझ्यासाठी दुय्यम असल्याचे सांगितले. याच गुरूमूर्ति महोदयांनी अनेकदा खोट्या बातम्या पूर्वी पसरवलेल्या होत्या. इस्लाम धर्मावर बंदी आणणारा अंगोला हा देश जगातील पहिला देश ठरला असल्याच्या खोट्या बातमीला गुरूमूर्तिंनी शेअर केले होते. धर्मनिरपेक्षतावाद्यांची टिंगलटवाळीही केली होती.https://saptahikyugantar.blogspot.com/ 

हिंदु मक्कल कच्ची (एच.एम.के.) या पक्षाचे अध्यक्ष प्रभाकरन यांनीही लॉर्ड अयप्पा क्रोधित झालेले असून त्यामुळे केरळमध्ये ही महाभयंकर आपत्ती उद्भवल्याचे म्हटले. खरे तर हा पक्ष तामिळनाडूमधील आहे. तामिळनाडूमध्ये सुनामीचे मोठे संकट कोणता देव क्रोधित झाल्यामुळे आले होते हे मात्र त्यांनी सांगितले नाही. अयप्पा क्रोधित झाल्यामुळे ही आपत्ती ओढवली असे काहीजण म्हणताहेत. तर केरळमध्ये गोमांस खाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे ही आपत्ती उद्भवली अशाही बीनडोक प्रतिक्रिया आल्या आहेत. समाजमाध्यमावर संघोट्यानी उच्छाद मांडला आहे. ख्रिश्चन, मुस्लिम, दलित, महिलांना या आपत्तीसाठी कारणीभूत धरले जात आहे. वास्तविक पाहता मोठ्या प्रमाणात पाऊस झाला हे सध्याच्या प्रलयाचे मुख्य कारण आहेच, पण कमी होत जाणारी जंगले, अनियोजित विकास, पर्यावरणाचा र्हास आदी कारणेही केरळमधील नैसर्गिक आपत्तीस कारणीभूत असल्याचे वैज्ञानिक एकीकडे सांगत असताना उच्च पदावरील व्यक्ती मात्र अवैज्ञानिक विधाने करून संभ्रम निर्माण करीत आहेत. इडुकी व वायनाड या दोन जिल्ह्यांतील जंगलक्षेत्र झपाट्याने कमी होत असल्याची आकडेवारी प्रसिद्ध झालेली आहे. 3930 चौरस किलोमीटरचे असणारे इडुकी जिल्ह्यातील जंगलाखालील क्षेत्र आता 3139 चौरस किलोमीटरपर्यंत खाली आले असून 20% पेक्षा जास्त जंगल कमी झाले आहे. ज्या 5 जिल्ह्यांवर सध्याच्या नैसर्गिक आपत्तीचा जास्त परिणाम झाला आहे त्यापैकी इडुकी हा एक जिल्हा आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

वायनाड जिल्ह्याचेही जंगलक्षेत्र 11%नी कमी झालेले आहे. एकीकडे जंगल, पर्यावरणाचा र्हास, अनियोजित विकास आदी कारणांचा शोध वैज्ञानिक व समाजवैज्ञानिक घेताहेत, तर गुरूमूर्ति, प्रन्नाकरण सारखी मंडळी आपत्तीचा संबंध साबरीमाला मंदिरातील महिला प्रवेशाशी जोडताहेत. संघ परिवाराचे, विज्ञान, संस्कृती, शिक्षण, इतिहास याचे विकृतीकरण व ब्राह्मणीकरण करण्याचे प्रयत्न अखंडपणे चालू असतात. नियोजनबद्ध पद्धतीने चालू असतात, हिंदुत्वाच्या नावाने केल्या जाणार्या राजकारणाचा भाग म्हणून चालू असतात व नैसर्गिक आपत्तीच्या काळातही हे प्रयत्न, राजकारण थांबलेले नसते. केरळमधील पूरग्रस्तांना डाव्या पक्षाचे मंत्री थेट जनतेत जाऊन कशी मदत करताहेत याची दखल लोकसत्ताने 22 ऑगस्टच्या संपादकीयात घेतली आहे. तो लेख या अंकात प्रसिद्ध केला आहे. डाव्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी, मंत्र्यांनी हाती घेतलेले हे काम अनेक दिवस सुरूच राहणार असल्याने सर्वच ठिकाणी पूरग्रस्तांसाठी निधी उभारण्याचे कार्य हाती घेणे गरजेचे आहे. केरळ पूरग्रस्तांसाठी मदत करू नका असाही प्रचार तथाकथित हिंदुत्ववादी मंडळी करताहेत. मदतकार्यात खोडा घालणार्या, डाव्या आघाडी सरकारला बदनाम करणार्या, तसेच अंधश्रद्धा पसरवणार्या, अवैज्ञानिक बाबी पसरवणार्या, संकटसमयी देखील धर्माच्या नावाने राजकारण करणार्या शक्तींचाही मुकाबला करावाच लागणार आहे.https://saptahikyugantar.blogspot.com/ 

केरळ पूरग्रस्तांसाठी 25 लाख रुपयांची मदत करणार्या भा...नेते व खासदार कॉ. डी. राजा, प्रत्यक्ष मदत कार्यात सहभागी झालेले भा... खा. विनय विश्वम, भा...चे सर्व मंत्री, लोकप्रतिनिधी तसेच केरळचे मुख्यमंत्री पीनरई विजयन यांच्या कार्यास सलाम!
- राम बाहेती

Post a Comment

Previous Post Next Post