पण तुम्ही पालघरबद्दल का बोलत नाही?


धडवाणी कशाचीच माहिती नसलेले चाळीस पैसेवाले चोर बोंबलत सुटले, की पालघर जिल्ह्यातला हा भाग कम्युनिस्टांचे क्षेत्र आहे... गेली काही दशके दादरा नगर हवेली सीमेनजीकच्या डांगडहाणू भागात, जव्हार मोखाडा भागात रा. स्व. संघाच्या वनवासी कल्याण आश्रम या उपसंस्थेने आपले सेवाकार्य सुरू केले होते. भारतभरात १९५२ पासून केले, तर महाराष्ट्रात १९७० पासून... लाल बावट्याखाली असलेल्या डहाणू भागात यांना विशेष थारा मिळत नव्हता.

आदिवासींना आदिवासी न म्हणता वनवासी म्हणण्याचा यांचा कावा कशासाठी होता. कुठलेही आदिवासी हे इथे आधीपासून आहेत हा अर्थ या शब्दातून ध्वनित होतो. हा ध्वनित अर्थ मोडून काढण्याचा मोठाच अजेंडा संघपरिवाराचा होता.

डांगडहाणूच्या आदिवासींना उभे रहायला शिकवणाऱ्या गोदावरी परुळेकरांची चळवळ त्यांच्यासोबतच संपली. लाल बावटा जेमतेम तग धरून राहिला. मग निवडणुकांत लहानू कोम सारख्या कम्युनिस्ट कार्यकर्त्या नेत्याचा पराभव झाला आणि काँग्रेस- भाजप यांचे नेते आळीपाळीने तिथून लोकसभेवर जाऊ लागले. गेल्या दशकात भाजपची ताकद धार्मिक तेढ उत्पन्न करण्याच्या ईस्टमनकलर जोरावर वाढत गेली. आणि कधी नव्हे ते या भागातल्या ग्रामपंचायती भाजपच्या नख्यांखाली आल्या. ओतायला पैसा आणि ओकायला विष असे सगळे भांडवल त्यांच्याकडे होतेच. वनवासी कल्याण आश्रमाने केलेल्या सेवाकार्याची वसुली कधी ना कधी संघाचा राजकीय पक्ष करणारच होता. सेवाकार्याचे पुण्य वापरण्यात काही ब्रिटिश मिशनऱ्यांची मक्तेदारी नाही. या लोकांनीही त्यांना शिव्या घालत तेच मॉडेल राबवले.

आज उजेडात आलेल्या गडचिंचले या गावाच्या पंचायतीतही भाजपचाच झेंडा आहे. ज्या भागात वनवासी कल्याण आश्रम वर्षानुवर्षे मलमपट्ट्यांचे सेवाकार्य करीत आहे तेथे भाजपला खुला प्रवेश मिळाला. त्यातलेच हे एक गाव. लाल बावट्याचे अस्तित्व मिटल्यात जमा आहे ते त्यांच्याच अकर्तृत्वामुळे- आणि काँग्रेस तर काँग्रेस आहे. सर्वदूर त्यांचे स्थानिक नेते गतमिळकतीच्या दुलईत गप पडून होतेच. (आताशा जराजरा धुगधुगी दिसू लागली आहे).

पण भाजपच्या आय़. टी. सेलच्या ओंजळीने ठर्रा ढोसणाऱ्या मूर्ख वैद्य-चितळे-गोडबोले टाईपच्या लोकांना सत्य काय ते माहीत नाही. त्यामुळे जिभा उचलून टाळ्याला लावणे, अख्खा जोडा स्वतःच्याच तोंडात कोंबणे वगैरे प्रकार त्यांनी परवा पासून सुरू केले.
तिकडे ग्राउंडवर- (बर्र का- ग्राऊंडवर म्हणायचं- शास्त्र असतंय ते) भीतीपोटी, कुजबूज गँगने पसरवलेल्या मुस्लिमविरोधी अफवांनी घाबरून गेलेल्या विचारहीन आदिवासींनी आधीच गस्त वगैरे प्रकार सुरू केले होते. मुस्लिम वेष पालटून येतात, करोना झालेले मुस्सलमान विहिरींत येऊन थुंकतात, मुलांना पळवतात वगैरे आख्यायिका जागृत हिंदू असल्याच्या अभिमान असलेल्या लोकांनी पसरवल्या होत्या. आदिवासी हा परंपरागत गोष्टी ऐकणारा समाज आहे. त्यांनी या गोष्टीरूप अफवांवर पूर्ण विश्वास टाकला. रात्री-अपरात्री गस्त घालणे सुरू केले. आणि कायदा मोडून, टाळेबंदी तोडून आडवाटा धुंडाळत निघालेल्या या दोन साधू (म्हणजे दाढीवाले लोकांना उल्लू बनवणारे चोरच ते) ना चोर समजून त्यांना निर्घृण मारहाण केली. त्यांचे काहीएक ऐकून न घेता त्यांना ठार करणारे हे सगळे बिचारे मूर्ख आदिवासी भगव्या बावट्याखाली गेलेले होते हे लक्षात घ्या.

कासा परिसरात मी चाळीस वर्षांपूर्वी पदवी शिक्षण घेताना प्रकल्पासाठी पायपीट केली आहे. तेव्हा डोंगर ओलांडून जाताना आडवाटांना असलेले बारके-बारके पाडे आता मोठी गावं झाले आहेत. तरीही रस्ते नाहीत, वीज नाही ही दुखणी कमीजास्त प्रमाणात सर्वत्र आहेच. निमजंगलात रहाणाऱ्या या गरीब आणि अविवेकी राहिलेल्या लोकांना भरकटवणे सोपेच असते. कॉम्रेड गोदावरी परुळेकरांनंतर या समाजाला सजग, अर्थपूर्ण नेतृत्व मिळालेच नाही. रिकाम्या पडलेल्या जागांत भरपूर उंदीरघुशी लागल्या. उदात्ततेचा दावा करणारे, मलमपट्टी आश्रमही त्यातलेच.

आज मुसलमानांविरुद्ध महाराष्ट्रात आग पेटवून स्थापित सरकार खाली खेचून पुन्हा यायची स्वप्ने पाहाणाऱ्यांची फळी कोणाची ते आपण सगळे जाणतोच. यातल्या सोद्यांना मनोमन माहीत असते आपण खोटे बोलत आहोत. त्यामुळे ते काही स्वतः रस्त्यावर गस्त घालायला उतरणार नाहीत. पण त्यांच्या जाळ्यात फसलेले- वनवासी- नव्हे आदिवासी मात्र पार गंडले. काहीही कारण नसताना गुन्ह्याचे धनी झाले. एकशेदहा जण तुरुंगात बसतील तेव्हा त्यांच्या मदतीला आता भाजप जाऊ शकत नाही. कारण त्यांच्याच क्षत्रपांनी त्यांना हिंदू साधूंना मारणारे गुन्हेगार ठरवले आहे. त्यांचे खून चढलेले नागाबोगा साधू या गावाला कोंडून ठार करायची भाषा करीत आहेत. सरकारला त्यांनीच बजावले आहे की यांना सोडाल तर याद राखा.

या शंभरेक आदिवासींना संघ-भाजपच्या पारड्यात बसण्याची अशी अद्दल आपल्याला घडेल असे कधीच वाटले नसेल. या वनवासींचे कल्याण झाले खरे!!!

यावर एक गोष्ट महाराष्ट्र सरकारने करायला हवी.. गुप्त सूचना मिली है, मुस्लिम व्यक्ती भेस बदलकर आ कर...अमुकतमुक वगैरे लिहिणारांचे स्क्रीनशॉट्स उपलब्ध आहेत. महाराष्ट्रात सोशल मिडियावर असलेल्या अनेकांनी या विषाक्त अफवांच्या पोस्ट्सचे स्क्रीनशॉट्स जमवण्याची मोहीम सुरू केली आहे. यातले पांडेधोंडे जे कोणी असतील त्यांना वैद्य-चितळे-गोडबोलेंसमवेत गुप्त माहितीच्या जाळ्यात बांधून घ्या. मूर्खपणालाही क्षमा नको आणि सहेतुक हलकटपणालाही नको.
- मुग्धा कर्णिक

Post a Comment

Previous Post Next Post