टाळ्या नको… सुरक्षा साधने द्या : भारतीय महिला फेडरेशनची केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी



संपूर्ण भारतभरात वैद्यकीय व आरोग्य क्षेत्रातील व्यक्तींबाबत केल्या जाणारा भेदभाव, अपमान आणि त्यांच्यावर होत असलेल्या हल्ल्याकडे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय महिला फेडरेशनच्या राष्ट्रीय सरचिटणीस कॉ. अनी राजा यांनी पत्र लिहिले आहे. या पत्राचा मराठी अनुवाद..

प्रति
मा. डॉ. हर्षवर्धनजी,
आरोग्यमंत्री,
भारत सरकार, नवी दिल्ली

विषय : वैद्यकीय व आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांबाबत होणारा भेदभाव आणि सुरक्षा विषयक प्रश्न.
 
आदरणीय हर्षवर्धनजी,
संपूर्ण भारतभरात वैद्यकीय व आरोग्य क्षेत्रातील व्यक्तीबाबत केला जाणारा भेदभाव, अपमान आणि त्यांच्यावर होत असलेल्या हल्ल्याकडे आपले लक्ष वेधण्यासाठी हे पत्र आपल्याला लिहित आहे. कोविड 19 ने संपूर्ण मानवी समाजासमोर व्यापक आव्हान निर्माण केले  आहे. यामुळे  भारतासह संपूर्ण जग एका आरोग्य विषयक अरिष्टातून जात आहे. या अरिष्टाला तोंड देताना वैद्यकीय आणि आरोग्य क्षेत्र अत्यंत कळीची भूमिका बजावत आहे. सफाई सेवक ते डॉक्टर, नर्सेस ते आशा वर्कर्सपर्यत सर्वजण आणि सर्व विभाग देशभर पसरलेल्या या साथीला तोंड देण्यात महत्वपूर्ण आणि समान भूमिका पार पाडत आहेत.

सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील आरोग्य कर्मचारी दिवसाचे 24 तास अखंड वैद्यकीय सेवा देऊन आजच्या अडचणीवर मात करण्यासाठी सरकारला सहकार्य करीत आहेत.  व्हायरसमुळे होणाऱ्या संसर्गाच्या जोखमीकडे दुर्लक्ष करून, त्याची तमा न बाळगता वैद्यकीय समुदाय त्यांची सेवा कोणताही गवगवा न करता देत आहे. वैद्यकीय समुदाय, विशेषत: मोठ्या संख्येत असलेल्या परिचारिका, नर्सेस, ज्या पूर्ण समर्पित भावनेने सेवा देत आहेत त्यांच्यापैकी काहीची कोरोना विषाणूची चाचणी पॉझिटिव्हआहे आणि त्या सार्वजनिक किंवा खाजगी दोन्ही क्षेत्रांत त्या अलगावमध्ये आहेत.

जरी भारत सरकारने आरोग्य आणि वैद्यकीय क्षेत्राची महत्त्वपूर्ण भूमिका ओळखून  त्यांच्यासाठी 22 मार्च 2020 रोजी संध्याकाळी टाळ्या वाजवून त्यांच्याबाबत आदर दर्शविला तरी  दुर्दैवाने, तेव्हापासून दररोज आरोग्य सेवकांवरील हल्ले आणि आरोग्य कर्मचाऱ्यांबाबत  भेदभाव केल्याच्या बातम्या सतत समोर येत आहेत. मुखवटा, मास्क न वापरणे, सर्वसामान्य नागरिक आणि पोलिसांकडून डॉक्टर आणि परिचारिकांवर शारीरिक हल्लाच्या बातम्या सतत येत आहेत. जेव्हा नर्सिंग व इतर कर्मचारी एन-९० चा मास्क  मागतात, तेव्हा अनेक खासगी रुग्णालये व्यवस्थापन त्यांना कामावरून काढून टाकण्याची  धमकी देत आहेत.

ज्या परिचारिकांचे करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्हआले आहेत त्यांना  अलगाव सुविधा, वैद्यकीय सेवा इत्यादी बाबतीत रुग्णालय व्यवस्थापन भेदभाव करीत असल्याबद्दलच्या  अनेक तक्रारी भारतीय महिला फेडरेशनकडे येत आहेत. जसलोक रुग्णालय, मुंबईतील नर्सिंग कर्मचार्‍यांना कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर तेथील व्यवस्थापनाने त्यांना पुरवलेल्या अपुऱ्या आणि किरकोळ सेवा याबाबत आलेल्या बातम्या  धक्कादायक आहेत.

अशामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांचा विशेषत: परिचारिकांचा (ज्यामध्ये बहुसंख्य स्त्रिया आहेत)
आत्मविश्वास डळमळेल आणि त्यांचे नीतिधैर्य खच्ची होईल. या सर्व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आपण त्वरित हस्तक्षेप करावा ही विनंती. म्हणूनच आम्ही पुढील मागण्या करीत आहोत.

मागण्या
1.       जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) आरोग्यसेवा  कामगारांविषयक  अंतरिम मार्गदर्शक तत्वांशी सुसंगत अशा राष्ट्रीय कोविड 19 व्यवस्थापन प्रोटोकॉलची घोषणा आणि अंमलबजावणी त्वरीत केली जावी.
2.       या प्रोटोकॉलचे उल्लंघन करणार्‍या आणि नर्सिंग स्टाफ तसेच इतर वैद्यकीय सेवा देणाऱ्यांना वैद्यकीय सुविधा देण्यास नकार देणाऱ्या सर्व हॉस्पिटल व्यवस्थापनांवर कडक कारवाई करा.
3.       कोविड 19 वार्डमध्ये  काम करणाऱ्यांसाठी राहण्याची सोय यासारख्या समान व सुयोग्य सुविधांची हमी द्या.
4.       ज्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्हआले आहेत त्यांना योग्य वेगळ्या सुविधा, अलगाव सुविधा, वैद्यकीय सेवा द्या.
5.       सर्व आरोग्य आणि सफाई कामगारांसाठी वैयक्तिक संरक्षक सुविधेची हमी द्या.
6.       आरोग्य कर्मचार्‍यांवर हल्ला करणाऱ्या, त्यांच्याशी गैरवर्तन करणाऱ्या आणि धमकी देणाऱ्या सर्वांवर कडक कारवाई करा.

ॲनी राजा
राष्ट्रीय सरचिटणीस
भारतीय महिला फेडरेशन

(मराठी अनुवाद : लता भिसे-सोनवणे)

Post a Comment

Previous Post Next Post