मुंबई, ता. ११ : मतदारांच्या प्रश्नांना उत्तर देण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असताना, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र निवडणूक आयोगाचे प्रवक्ते असल्याप्रमाणे वागत आहेत आणि मत चोरी प्रकरणी बाजू मांडण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. मत चोरी करून सत्तेत आलेल्या सरकारविरोधात होणाऱ्या प्रत्येक आंदोलनात भारतीय कम्युनिस्ट पक्ष (C.P.I.) पूर्ण ताकदीनिशी सहभागी होईल,असा ठराव पक्षाच्या नुकत्याच झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत करण्यात आला. अध्यक्षस्थानी पक्षाचे राष्ट्रीय कौन्सिल सदस्य कॉम्रेड तुकाराम भस्मे होते.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक मुंबई येथे भूपेश गुप्ता भवन येथे संपन्न झाली. या बैठकीत लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी मत चोरीच्या केलेल्या भांडाफोडीबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीत बोलताना पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉम्रेड ॲड. सुभाष लांडे म्हणाले, राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाविरुद्ध पुराव्यानिशी गंभीर तक्रार करत, मतचोरीचा आरोप केला आहे. राहुल गांधींच्या म्हणण्यानुसार, भाजप नेतृत्वाखालील सत्ताधारी आघाडीने निवडणूक आयोगाच्या मदतीने मतदार यादीत फेरफार करून सत्ता मिळवली आहे. याप्रकरणी देशपातळीवरील इंडिया आघाडीच्या आंदोलनाला भारतीय कम्युनिस्ट पक्षाने सक्रीय पाठींबा दिला आहे. खासदार राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना निवडणूक आयोगाने थेट उत्तर द्यायला हवे असताना भाजप नेतेच पुढे येऊन उत्तरे देत आहेत आणि मत चोरी प्रकरणी सारवासारव करण्याचा प्रयत्न करत आहेत. राहुल गांधी व इंडिया आघाडीने उपस्थित केलेले मुद्दे देशाच्या लोकशाहीच्या भवितव्यासाठी महत्त्वाचे असून, याबाबत निवडणूक आयोगाने त्वरित पारदर्शक उत्तर देणे आवश्यक आहे.
बैठकीला अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष कॉ. राजन क्षीरसागर, पक्षाचे राज्य सहसचिव कॉ. राजू देसले, कॉ. शाम काळे, कॉ.डॉ. राम बाहेती, कॉ. प्रकाश रेड्डी, कॉ. स्मिता पानसरे, कॉ. नामदेव चव्हाण, कॉ. मिलिंद रानडे, कॉ.डॉ. महेश कोपूलवार, कॉ. शिवकुमार गणवीर, कॉ.ॲड. हिरालाल परदेशी, कॉ. अशोक सोनारकर, कॉ. माधुरी क्षीरसागर, कॉ. हौसलाल रहांगडाळे, कॉ.ॲड. बन्सी सातपुते, कॉ. अनिल घाटे, कॉ. अशोक सूर्यवंशी आदी नेते उपस्थित होते.